सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

सहज सुचलेले....!!!

शांत कातर संध्याकाळ.... माझ्यात गुंतत चाललेली मी....
दूर क्षितीजावर लालिमा पसरवुन, निघुन चाललेला तु....

खरंच मनात येतो विचार.... कसं ना आपल नातं....

तुझ्या-माझ्यातलं नातंच तितकं विचित्र....
तुझ्या येण्याने आपसुक येणारा उत्साह, आनंद.... सगळंच किति लोभसवाणं.... तुझ्या त्या रुपाप्रमाणेच....

तुला पाहुन एक अनावर उर्मि दाटुन येते मनात.... उठण्याची, काहीतरी करुन दाखवण्याची....
तुझ अस्तित्वच इतकं भुलवणारं की.... भुलत जाते मी तुझ्या प्रत्येक रुपात....

आयुष्यात सगळं तसंच शांत, लोभस राहाणार नाही....
सांगत जातोस माझ्या कानात प्रत्येक उलटणार्‍या क्षणागणिक....

तुझं नितांत सोज्वळ रुप क्षणाक्षणाला बदलत जातं....
दाहक होतोस संतापाने.... असं आपलं उगीच मला वाटून जातं....

पण तोदेखिल नियम असावा तुझ्या अखंड व्रताचा....
त्या दाहकतेमध्येही.... माझ्या पाठीशी ठेवतोस एक थंड सावली....

हळू हळू उतरत जाताना.... जाणवते ती आपल्या निरोपाची जवळ आलेली वेळ....
ताटातूट होणार तुझ्यापासून म्हणून व्याकुळते मी....

शांत कातर संध्याकाळ.... माझ्यात गुंतत चाललेली मी....
दूर क्षितीजावर लालिमा पसरवुन, निघुन चाललेला तु....

तु गेल्यानंतरसुद्धा निसर्गनेमाने चालत राह्ते आयुष्य....
पण तुझ्या असण्याने मिळालेला तेजोमय उत्साह.... आठवत राहतो सतत....

जाताना असतात शांत, कॄतार्थ भाव तुझ्या चेहर्यावर....
संगातुन नित्संगाकडे चाललेल्या योग्याचा आनंद तुझ्या चेहर्यावर....

आणि तशीच मी.... शांत, निश्चल.... तुझ्या उद्या येण्याची आस धरलेली....

-स्वाती....