बुधवार, १७ मार्च, २०१०

आम्ही पाहीलेले (की भोगलेले...??) स्नेह्संमेलन!!

(हा लेख मी आणि माझा एक मित्र (जो दुर्दैवाने आता हयात नाही.. :( ) असं दोघांनी मिळून लिहीलेला आहे.)

माणसाची व्याख्या अनेकांनी (म्हणजे माणसांनीच) आपापल्या परीने केली आहे. कुणाच्या मते माणूस हा ’समाजशील’ प्राणी आहे. पण माणूस आणि समाजात ’स’ आणि ’म’ शिवाय काहीही साम्य नाही. बहुधा सर्व माणसे समाजात ’शील’ राखण्यासाठी जगतात म्हणून हे नाव पडले असावे.
काहींच्या मते माणूस शिस्तप्रिय प्राणी आहे. पण मुंग्यांशिवाय या जगात कुणीही सरल चालत नाही. तात्पर्य काय तर माणसाची व्याख्या (माणसांनीच केलेली) अपूर्ण आहे.

खरे म्हणजे माणूस हा स्नेहसंमेलने करणारा प्राणी आहे. माणसांशिवाय इतर कुणीही प्राण्यांनी स्नेह्संमेलने केल्याचे ऐकीवात नाही. सिंह आणि वाघ शेजारी बसले आहेत, मोर सुंदर नॄत्य करतो आहे, कोकिळा गाणे गात आहे, हत्ती-घोडे सर्कस करीत आहेत, कोल्हा सूत्रसंचालन करत आहे. असे संमेलन कधीच नसते. (शंकेखोर वाचकांनी इसापनीतितील प्राण्यांचा विचार करु नये.)

म्हणूनच माणूस हा स्नेह्संमेलने करणारा प्राणी आहे. "खरीप हंगामात रब्बी पिकांची लागवड" पासून ते "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" पर्यंत अनेक संमेलने होत असतात. काहींच्या मते संमेलनांना निमित्त लागते परंतु वास्तविक पहाता संमेलनांच्या निमित्ताने लोक आपले (अ)विचार, कला सादर करतात. इतर कुठल्याही ठिकाणी वाचल्या किंवा ऐकल्या न जाऊ शकणा-या कविता कवी लोक "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात" (येथे मराठी ऐवजी हिंदी, बंगाली, इंग्रजी, कन्नड इ. लिहीता येऊ शकतात.) ऐकवतात. काही हौशी पालकांनी आपल्या मुलांना हट्टाने तबला, पेटी, गायन इ. क्लासला घातले असल्यास, ती मुले संमेलनात आपली कला दाखवून आपल्या पालकांचा निर्णय कसा चुकीचा होता हे दाखवून देतात.

अशाच एका स्नेहसंमेलनाला जाण्याचा परवा योग (की भोग?) आला. संमेलनाला अध्यक्ष कोण, हा प्रश्न गौण असतो. श्री. कुक्कुटराव मुर्गीवाले (मालक: कुक्कुटेश्वर पोल्ट्री प्रा. लि.) पासून ते श्री. मा. ज. लेले पर्यंत कुणीही अध्यक्ष म्हणून चालतो. लोकांना वाटतं अध्यक्ष होणं म्हणजे काय? दोन शब्द बोलायचे आणि खुर्चीवर जाऊन बसायचं, पण वास्तविक ज्यांचं जळलं आहे त्यांनाच कळेल. अध्यक्षांना कारण नसताना संबंधित संस्थेवर स्तुतीसुमने उधळावी लागतात. परत भाषण सुरु झाल्यावर लोकांना इन्टर्वल झाला आहे असा गैरसमज होण्याचा धोका असतो. बक्षिस वाटपाला तर फ़ारच पंचाईत होते. एखाद्या मुलीला बक्षिस देताना (प्रथम क्रमांक: लिंबू चमचा शर्यत) उगीचच कौतुकाने हसावे (व नंतर फ़सावे) लागते. आता लिंबू चमचा शर्यत प्रथम क्रमांक यात कसले आले आहे कौतुक पण हसतात बिचारे... काही उत्साही पालक आपल्या मुलांचे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढतात. त्यामुळे अध्यक्षांना वेगवेगळ्या पोजेसला उभे राहावे लागते. सर्वात कठीण म्हणजे पुढील सर्व कार्यक्रम खुर्चीवर बसून न हालता (व न झोपता) पाहावे लागतात. तात्पर्य काय तर संमेलनाचा अध्यक्ष कोण हा प्रश्न गौण आहे.

कुठलेही संमेलन वेळेत सुरु न होणे हे ढगातून पाणी पडण्यासारखे स्वाभावीक आहे. (ढगातून पाणी पडण्याचा आणि वेळेचा इथे आईशप्पथ काहीही संबंध नाही.) तर ते किती उशीरा सुरु होते यावर त्याचे महत्त्व ठरते.

कुठल्याही संमेलनाला संयोजक हवा असतो. आम्ही उपस्थित असलेल्या सर्व कार्यक्रमालाही संयोजक होते. संयोजकाच्या अवतार लग्नातल्या नव-याच्या भावासारखा होता. संयोजकही निवडावा लागतो. अतिशय स्थितप्रज्ञ संयोजक समारंभाचा विचका करु शकतो. तो थोडा भांबावलेलाच असला पाहीजे. तो एका वेळी अनेकांना सुचना देण्याइतपत अष्टावधानी असतो. "अरे राजा फ़ुलं आण, नारळ कुठे आहे? टेबल सांडेल ना..- उभा धर, अरे इकडे खुर्च्या लौकर फ़ोड..- अरे तो माईकवाला आला का? पडदा लावला का? सतरंजी इकडे नको तिकडे...." यातून कार्यकर्त्याला आपल्यासाठी कोणती सुचना आहे हे कळावे लागते. त्यांचे प्रश्न असतातच....
पहिला: सर फ़ुलं नाही आली.
दुसरा: टेबल
तिसरा: क्लॉथ
चौथा: टेबल क्लॉथ
पहिला: सर, अध्यक्षांचा फ़ोन होता, त्यांना उशीर होईल.
खुर्चीवाला: सर, स्पीकर बिघडलाय.
माईकवाला: सर, खुर्च्या कमी पडतायेत.
एक प्रेक्षक: सर, प्रेक्षक घाई करताहेत.
पहिला: सर, लाईट कुठे लावू?
दुसरा: सर, सतरंज्या कुठे घालू?
तिसरा: सर, सरस्वतीचा फोटो कुठे लावू?
.
.
.
.
.
सतरावा: सर, नारळ कुठे फ़ोडू?
संयोजक: माझ्या डोक्यावर...
पहिला: नाहीये त्यांना... म्हणजे अध्यक्षांना वेळ नाहीये.

असे करता करता शेवटी संमेलन सुरु होते. सुत्रसंचालक माईकवर "हेलो हेलो" का म्हणतात कोण जाणे? कदाचीत कुणाचे नाव पुकारले आणि माईक बिघडला असल्यास विपर्यास होऊ शकतो. परंतु प्रेक्षकांचा गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी हे म्हणत असावा (हेलो हेलो हा शब्द ’हळू हळू’ ची व्युत्पत्ती.) गणेश वंदनाने, गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होते. केवळ हे देवाचे गाणे असते म्हणून लोक आधी आवंढा व नंतर राग गिळून गप्प राहतात. संमेलनाचे सुत्रसंचालक आठवतील तेवढ्या म्हणी, सुविचार यांचा मुक्त कंठाने वापर करतात. खरं तर "टवाळा आवडे विनोद" हे वाक्य एक विनोदी नाटकानंतर म्हणायची काहीच आवश्यकता नसते. माईकमधून किं........ असा आवाज येतो तो नेमका नाटकाच्या वेळीच का कोण जाणे??

कलाकारांचे ’जवळून’ दर्शन फ़क्त एकच जण घेऊ शकतो किंबहुना ते तो घेतोच, तो म्हणजे फोटोग्राफ़र. नेमका नाच रंगात आला असताना त्याच्या अंगात येते. प्रेक्षकांच्या भावनांशी त्याला काहीही घेणे देणे नसते. अख्ख्या कार्यक्रमात न हसणारे आणि न बोलणारे दोघेच.. एक माईकवाला आणि दुसरा फ़ोटोग्राफ़र! फ़ोटोग्राफ़र ’नटसम्राट’ असु दे किंवा पाश्चात्य पद्धतीचे नॄत्य असु दे, एकाच अलिप्त भावनेने पाहतो.

काही मंडळी उगाचच इकडून तिकडे फ़िरत असतात. लग्नात ज्याप्रमाणे करवल्या हिंडतात त्या आविर्भावात... बहुतेकांची अशी समजूत असते की ’तो’ किंवा ’ती’ आपल्याकडेच ’बघतो’ किंवा ’बघते’ आहे. त्यामुळे तेही हळूच बघून घेतात. वास्तविक त्यांचा यात काहीही सहभाग नसतो. तरीही उगाचच पुढे पुढे करतात. ह्यांना एका जागी बसल्यावर अपमानित झाल्यासारखे वाटत असावे किंवा त्यांना उभे राहून जास्त मजा येत असावी.

अशातच पडेल ते काम करणारे काही स्वयंसेवक असतात, (पु. लं. च्या नारायणप्रमाणे). इतर वेळेस यांच्यावाचून काहीही न करता येणा-यांचे ते सत्काराला किंवा फोटोसाठी आले नाहीत तर काहीही अडत नाही. बरोबरच आहे, ते जर स्टेजवर आले तर पडद्यामागची सुत्रे कोण हलवणार? कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहारात जेव्हा सगळेजणं मशगुल असतात तेव्हा ते रिकाम्या प्लेट्स आणि शीतपेयांचे रिकामे ग्लास उचलत असतात.

(तळटीप: चाणाक्ष वाचकांना प्रस्तुत लेखकाने (म्हणजे आम्हीच) पु. लं. च्या लेखनाची (असफ़ल??) नक्कल करण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय येईल. साहजिकच आहे, त्यांची चार-पाच पुस्तके आजूबाजूला ठेवूनच हा लेख लिहिला आहे. क. लो. अ.)

-स्वाती...

सोमवार, ८ मार्च, २०१०

स्वयंवर नही शादी..... (कर्म माझं!!!!)

अरे हे काय चाललंय काय?? कुणीही यावं आणि टिकली मारुन जावं सारखं कुणीही उठावं आणि स्वयंवर मांडावं असं चालू झालंय.... पूर्वीच्या काळी म्हणजे महाभारतात वगैरे... पोरींची स्वयंवरं ठेवली जायची... (म्हणजे राजे लोकांच्या)... आणि आज काल....
बाई-माणसांची (पक्षी सावंतांची राखी) आणि स्वतःला माणूस म्हणवणारा एक द्विपाद प्राणी (पक्षी राहुल महाजन) यांची स्वयंवरं... म्हणून म्हटलं अरे काय चाललंय काय???
आमच्या या वरील चीडचीडीचं कारण तुम्ही हा परम प्रताप पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणजे राखीचं लग्न पाहायची संधी तुम्ही हुकवली असेल तर NDTV Imagine नामक एक वाहीनी तुमच्यासाठी सध्या एक नवीन उच्छाद मांडत आहे... "राहुल का स्वयंवर!!" राहुल दुल्हनीया ले जायेगा वगैरे असं काही तरी.. (खरं तर दुल्हनीयांचा आविर्भाव पहाता त्याच राहुलला घेऊन जातील असं जास्त वाटतं... )
आता तुम्हाला प्रश्न पडेल की इतका प्रोब्लेम आहे तर ही मालिका पहावीच कशाला?? पण त्याची काही मुलभूत कारणे पुढीलप्रमाणे:
१. सहनशक्ती वाढते.
२. जगात यांचीही लग्नं होतात मग आपण तर बरेच चांगले आहोत. (लग्नेच्छू तरुणाईला दिलासा...)
३. पैसा असला की तो कुठेही वहातो याची जाणीव होते.
४. समर्थांनी मुर्खांची एवढी लक्षणे सांगूनही आणखी बरीच उरली आहेत याची कल्पना येते.....
अशी अजुन य कारणं सांगता येतील पण तुर्तास वानगीदाखल एवढी पुरेत...
तर या जीवघेण्या प्रकाराची सुरुवात झाली ती राखी सावंत हिच्या स्वयंवराने.. ज्यांनी ज्यांनी हा भीषण प्रकार पाहीला त्यांना त्या दुःखद क्षणांची आठवण करून दिल्याबद्दल क्षमस्व! पण ते काय आहे ना कि खपली काढायची जीत्याची खोड आहे आमची...
असो... कु. सावंत हीने स्वतःला जाहीररीत्या चि. सौ. कां. घोषीत केले, आणि सुरु झाला एक खेळ.. (जो पुढे बहुतेकांच्या लग्नांवर बेतला.) तीचे स्वयंवर मांडायचा उत्साह एवढा होता कि विचारू नका. लहान लहान मुलांपासून ते म्हाता-या माणसांपर्यंत प्रत्येक जण राखीचा दुल्हा व्हायला उत्सुक.. शेवटी तीने त्यातल्या त्यात एक बिचारा (कोणी तरी आंग्लभाषीक आहे म्हणजे होता...) निवडला आणि स्वयंवर म्हणजे साखरपुडा असा स्वतःला सोयीस्कर (आणि त्या बिचा-याची थोडक्यात सुटका करणारा) अर्थ लावुन ती बया मोकळी झाली.
असो.. तेव्हा परत असं काही पहाणे नाही रे बाबा असा (सुटकेचा) नि:श्वास टाकुन आम्ही "त्या इंग्रजाची लौकर सोडवणूक कर रे!" अस देवाला विणवू लागलो. (हो मग.. हीच्या हौसेसाठी त्याला का जन्मठेप.. कुठल्याच पापाला ही शिक्षा असू शकत नाही.)
पण त्या परमेश्वराच्या मनात अजून एकदा आमची कुचेष्टा करायची लहर आली आणि त्याने NDTV Imagine ला अजून एक कानमंत्र दिला.
स्वत: श्री. राहुल महाजन यांचे स्वयंवर.. चुकले स्वयंवर नही शादी.. (अर्थातच दुसरे)
आणि आम्ही ते पाहिले. (हो घडलेल्या पापांची कबुली दिलीच पाहिजे नाहीतर पुढ्च्या जन्मी राखी सावंत होते म्हणे..)
तर या छळवादाची सुरुवात झाली १७ तरुणींपासून आणि लग्नाचा संयोजक होता अर्थातच तोच तो... राम कपूर!!! (याचा पत्ता द्या रे कुणीतरी!!)
सतत नळावर जमलेल्या बायकांप्रमाणे भांडणा-या नवतरुणी, विनाकारण चीड आणणारे हसू हसणारा तो महाजनांचा पो-या.. (च्यायला... बाप का नाम पूरा मीट्टी में मिलाई दिये...) आणि चेह-यावर अशक्य तुपट, आनंदी भाव ठेवणारा तो राम.. बघूनच एखाद्याला उलटी यावी. अश्या या समस्त लोकांनी अव्याहतपणे चालवलेला हा मदा-याचा खेळ म्हणजे "राहुल का स्वयंवर.... नहीं शादी!!"
एका एका तरुणीची या भयानक प्रकारातून सुटका होत होत शेवटच्या चार जणी उरल्या... (अहो यात चक्क एक जण आमच्या पुण्याची पण होती हो..) का?? का?? देवा, माझ्या अविवाहीत मित्रांवर हा अन्याय??? मग तो त्यातल्या प्रत्येकीच्या घरी जाण्याचे सोपस्कार सुरु झाले. घरचे सगळे लोक तो अगदी जावई असल्याप्रमाणे त्याचे लाड करत होते. (सोन्याच्या चमच्याने त्याला पोहे भरवल्याचे आम्ही या डोळ्यांनी पाहीले आहे हो...) बाकी या असल्या चेह-याच्या (आणि चरित्राच्या) माणसाचे कौतुक कसे काय करावेसे वाटते बाबा लोकांना??
यानंतर पुणे कन्या या खेळातून (की छळातून?) बाहेर पडली...(हुश्श... सुटलीस गं बायो!!) आणि उर्वरीत तिघींची परवड सुरु झाली. काय त्या राहुलचे ते चाळे,काय ते हसणं,वागणं,बोलणं,बघणं... आणि उच्चांक म्हणजे ते लाजणं... (अरे का लाजतोयस?? लग्न पहिल्यांदा का होतंय तुझं?? असं ओरडावंसं वाटायचं..)
शेवटी होता होता हा प्रकार शेवटाला आला आणि राहुलच्या लग्नाचे थेट प्रक्शेपण सुरु झाले. अनेक रिकामटेकडे पुरुष आणि स्त्रिया उगाच घरचे कार्य असल्यासारख्या तिकडे मिरवत होते. हळदी, मेहंदी, संगीत सगळीकडे साग्रसंगीतपणे हा जोकर मिरवल्यावर त्याची "आली समीप लग्नघटीका" आणि राहुल "अवतार"ला... (त्यावेळी वरातीत "तेणु दुल्हा किसने बनाया भुतनीके" हे समर्पक गाणे लावायला हवे होते...) :)
मग पट्कन निकाल सांगून मोकळे व्हायचे तर तो राम परत परत सगळ्यांना कसं वाटतंय?? कसं वाटतंय?? असं विचारून उगाच डोकं खात होता. (आता कितीही नको नको वाटत असलं तरी कुणी TV वर सांगणारेत का? की ’चल गं बाई घरी दुसरा मिळेल आपल्याला ब-यापैकी’ असं.. आमच्याइतका स्पष्टवक्तेपणा अभावानेच आढळतो म्हणा..)
तर मग ब-यापैकी उत्सुकता (बळंच हं.. जणू काही आम्ही फ़टाकेच उडवणार होतो याचं लग्न झालं की..) ताणून धरल्यावर त्याने त्यातल्या त्यात ब-या मुलीच्या गळ्यात (एकदाची!) माळ घातली. (आणि इतर दोघींनी मनातल्या मनात दिवाळी साजरी केली.)
आणि मग काय विचारता लोकांच्या चेह-यावरचा आनंद.. आहाहाहा... धन्य झालो आम्ही... (संपलं एकदाचं च्यामायला...)
आणि मग... अचानक आठवलं.. (त्याच त्या रामला.. पत्ता द्याच त्याचा...) कि अरे हे तर स्वयंवर नही शादी आहे... मग झालं.. समोरच मंडप टाकलेला आणि दणक्यात महाजनपुत्राची शादी झाली.. आणि कार्यक्रम संपला संपला म्हणता म्हणता वाढला..... :( [हे सगळे चालू असताना आम्हाला ओरडून विचारावेसे वाटत होते कि "अरे सख्खा काका गेला ना तुझा?? सुतकात काय लग्न करतोस??"] पण जे जे होइल ते ते पाहाणे आणि ब्लोग लिहिणे हेच जिवित कार्य असल्याने नाइलाज आहे हो....
असो... अश्यारीतीने ही साठां उत्तरांची कहाणी, पाचां उत्तरी सुफ़ळ संपूर्ण.. (एकदाची..)!!!

ता. क.: आता परत ही वाहीनी राहुल-भगीनी संभावना सेठ हिच्या स्वयंवराचा प्रस्ताव घेऊन येत आहे.. (कली मातला आहे, असं आमची आज्जी म्हणायची....)
असो.... Just wait n (don't) watch!!!