सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

तो... माझा सखा...!!!

काल पुन्हा तसंच झालं... सुर्यास्ताची वेळ.... समुद्रकिनार्‍यावर निश्चल बसलेली मी.....
आणि अचानक झेपावून आला तो माझ्याकडे.... आकंठ भिजवून टाकलं त्याने मला स्वत:च्या त्या आवेगात....
क्षणभर सुचलंच नाही मला काही आणि जेव्हा जाणवलं काय झालं तेव्हा अनिर्बंध बरसत होता तो माझ्या सर्वांगावर....
माझी मी अशी उरलीचं नव्हते.... सगळीकडे फक्त तोच, तोच आणि तोच....
माझा एकांत ही माझा राहिला नाही, माझं अस्तित्वही नाही.... सगळं सगळं व्यापून उरला तो....
सगळं काही नितळ, निर्मळ करत राहिला.... त्याच्या त्या रुपाप्रमाणेच....
आणि मी अनिमिष डोळ्यांनी पहात राहिले.... त्याच्याकडे....
डोळ्यातले पाणी पण पुसायचे भान न राहून.... माझे अश्रू पण सामावून घेतले त्याने स्वतःमध्ये....
किती कमी वेळा मिळतो हा बेधुंद क्षण त्याच्यासोबतचा.... त्याच्यासाठीचा.... तरसत असते मी ज्यासाठी....
आमची ही भेट पाहुन समुद्रदेखील उधाणलेला असतो आनंदाने.... माझ्या सख्ख्या मित्रासारखा....
पाहिलेली असते त्याने मी केलेली प्रतिक्षा त्याच्याच साक्षीने.... त्याची धीर गंभीर गाज ऐकू येत असते फक्त....
आता तर संध्याप्रकाशानेदेखील आवरता घेतलेला असतो आपला खेळ....
तो, मी आणि शांत कातरवेळ....
पण आज यावेळी ऊरभर दाटणारी हुरहुर नसते....
कारण माझ्या सख्याच्या बाहुपाशात तिला स्थानच नसते....
हळूहळू अंधाराचा पडदा उलगडत जातो माझ्या सर्वांगावर.... हवाहवासा वाटतो त्याच्यासोबतचा तो एकांत....
पण वेळ झालेली असते त्याच्या परतण्याची....
"आज नको ना जाऊ...." पुटपुटते मी त्याच्या कानात....
'पण ते शक्य नाही राणी....' ही अगतिकता जाणवते मला त्याच्या स्पर्शात....
क्षण क्षण, निमिष निमिष दूर होत जातो तो माझ्यापासून....
त्याला थोपवण्याचा माझा प्रयत्न पडतो तोकडा....
आणि पुन्हा मी उरते एकटी.... समुद्रकिनार्यावर.... पण आनंदात न्हाऊन निघालेली....
तॄप्त.... पुन्हा त्याच्या येण्याची आस धरलेली....

-स्वाती....