गुरुवार, १० जून, २०१०

कट्टा....!!!

आत्ता नक्की दिवस कोणता होता, वेळ कोणती होती ते आठवत नाही.... पण २००३ सालातली कुठली तरी एक दुपारची चांदण्याची वेळ होती एवढं आठवतय.. जेव्हा माझी पहिल्यांदा त्याच्याशी ओळख झाली. स्थळ:फर्ग्युसन कॉलेज, पुणे-२. दादासोबत BCS चा फॉर्म भरण्यासाठी मी चालले होते. कॉलेजच्या गेट मधून आत गेल्या गेल्या समोर एक सुंदर बिल्डींग (अगदी जुन्या सिनेमात खपून जाईल अशी...) त्यासमोर एक सुंदर सर्कल (त्यात कारंज्यासारख काहीतरी दिसत होतं...) आणि त्या सर्कलच्या जवळच असलेला "तो"!!! बापरे त्याचं पहिलं रूप पाहूनच घाबरले होते मी.... त्याच्या आसपास जमलेली मुलं-मुली आणि त्यांच्या एकेक त-हा पाहून आपल्याला नाही बा यायचं इथे... असा मी मनातल्या मनात ठरवलं!!! पण हे दादाला कसं काय कळलं कुणास ठाऊक?? मला हळूच म्हणाला तो, "गुड्डी याचा तुझ्याशी जास्त संबंध येणार नाहीये!! हे नुसतं वरवरचं आहे.. खरं FC याहून खूपच वेगळं आहे..." आणि मी शांतपणे दादाच्या मागून चालू पडले... खरंतर त्याला पाहून एक क्षण भीती वाटली हे खरंय पण मी थोडीशी हुरळले पण होते... भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्याच्याजवळ बसलेला तो ग्रूप... बर्मुडा घातलेली, झिप-या वाढवलेली, काळे काळे टी शर्ट घातलेली आणि हातात गिटार घेऊन काहीतरी अगम्य भाषेत गाणारी मुले, त्यांच्या त्या बर्मुडा पण  मोठ्या वाटतील एवढे लहान स्कर्ट घातलेल्या २ मुली... अरे ही असली गर्दी आहे या कॉलेजमध्ये...(हो, गर्दीच!! कारण तेव्हा Croud या शब्दाचा परिचय व्हायचा होता... आणि ज्या ग्रूपला पाहून मला भीती वाटली होती... तो नुसता Croud नाही तर तिथला coolest आणि happening croud होता हे अगाध ज्ञान मज अडाण्याला कुठून बरं असणार?? जाऊ दे बरच पाल्हाळ लागतंय!!) तर मी काय सांगत होते, "माझा, हडपसरसारख्या लहान जागेतून आलेल्या मुलीचा इथे काय निभाव लागणार???" अशी भीती वाटत असतानाच, "तो" जणू मला मिश्किलपणे म्हणत होता की "इथे आल्यावर माझ्यापासून लांब राहणं मुश्कील ही नही, नामुमकीन है!!!" आणि मी त्याच्याकडे पहात पहात दादाच्या मागून चालले होते. 

शेवटी "मिळणार की नाही, मिळणार की नाही" या धाकधुकीमधून बाहेर येऊन मला FC ला प्रवेश मिळाला. पहिल्याच दिवशी, एका अनोळखी जगात, एका खूप भार्री कॉलेजमध्ये (हे मत तेव्हापासून आहे माझं... की FC इतकं भार्री कॉलेजच नाहीये...) मी जवळजवळ भांबावलेल्या अवस्थेत उभी असताना एक मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली "इथे Computer Science चं department कुठेय??" आली का पंचाईत?? अब एक अंधा दुसरे अंधे की क्या मदद करेगा?? पण तरी मी तिला नेटाने "चल मी पण तेच शोधतेय" असं म्हणाले. आणि आम्ही दोघींनी त्या department चा शोध लावला... (कोलंबसला अमेरिका शोधल्यावर काय आनंद झाला असेल असा आनंद मला ते department, त्या department मधला माझा वर्ग आणि त्या वर्गातली माझ्यासारखीच येडी दिसणारी पोरं-पोरी पाहून झाला.... :)) चला, आपल्यासारखेच अजून भरपूर जण आहेत... हा दिलासा मिळाल्यावर एकेकाशी बोलणे, ओळखी करून घ्यायला सुरुवात करणे अश्या धामधुमीत पहिला दिवस संपला... घरी जाताना परत त्याच ठिकाणी "तो" दिसला.. एकटाच!! "अरे आज इथे कोणी नाही वाटतं. नाहीतर सारखं इथे अख्ख्या FC मधली टपोरी लोक पडीक असतात.." ती माझी नवी मैत्रीण वय वर्षे एक दिवस सांगत होती. (हे वय तिचं नसून आमच्या मैत्रीचं आहे. सुज्ञास सांगणे न लगे) हे ऐकून त्याच्याबद्दलची भीती जाऊन आता तिथे हळूहळू तिरस्कार यायला लागला होता... 


दुस-या दिवशी कॉलेजमध्ये जायच्या आधी एका नवीन मित्राशी ओळख झाली.. आदित्य... तो माझ्या मावशीच्या शेजारीच राहणारा होता आणि माझ्याच वर्गात होता... त्यादिवशी कॉलेजमध्ये गेल्या क्षणी समोर दिसलेलं दृश्य पाहून मला धक्काच बसला. "अरे हा आदित्य टपोरी आहे?? घरी तर किती साळसूद वाटत होता..." या धक्क्याच कारण म्हणजे आदित्य चक्क "त्याच्या" इथे बसून इतर मुला-मुलींशी बोलत होता, हसत होता, टाळ्या देत होता... आणि मी आदित्यने मला ओळखू नये, आणि ओळखलच तर किमान ती दाखवू नये यासाठी शक्य तितक्या लौकर तिथुन जायचा प्रयत्न करत होते.. इतक्यात पाठून हाक आली... "ए स्वाती... कशीयेस??" "मी बरीये आदित्य.. आणि मला परत असं ओरडून हाक मारायच्या फंदात पडू नकोस... मला तुझ्यासारख्या मुलाशी बोलायचं नाहीये" हे सगळं असंच "कंसात" बोलून मी त्याला तोंडावर "हाय, अरे सॉरी मी तुला पाहिलंच नाही... कसा आहेस??" असं म्हणून टाकलं. "मी मस्त.. बस ना इथं गप्पा मारुयात, लेक्चरला बराच वेळ आहे अजून.." आणि मला हो नाही म्हणायची संधी न देता त्याने मला त्याच्या त्या ग्रुपमध्ये ओढलं... (शब्दश:... तेव्हा मी बरीच बारीक होते... :)) आणि इथे माझी "त्याच्याशी" पहिली ओळख झाली.. तोच तो ज्याला पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हा त्याच्याबद्दल भीती आणि कुतूहल दोन्ही वाटलं होतं... आणि त्यानंतर "तो" माझा जिवाभावाचा सखा झाला... अरेच्या... तुम्हाला हा "तो" कोण ते सांगितलंच नाहीये न मी.... हा "तो" म्हणजे आमच्या कॉलेजचा "कट्टा"....!!!!


तर त्यादिवशी मला त्या कट्ट्यावर मुलांमध्ये बसून गप्पा मारताना पाहून माझी ती क्रमांक १ मैत्रीण आणि तिच्याचमुळे भेटलेल्या अजून २ मैत्रिणी यांनी ताबडतोब कोपरा सभा घेऊन मला सामुहिकपणे झापायच ठरवलं... कारण या कोलेजच्या मतलबी आणि संस्कारशुन्य जगात मला सांभाळण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर होती.... :) "स्वाती तू त्या कट्ट्यावर काय करत होतीस?? तुला माहित्ये कशी मुलं आहेत ती?? एक नंबरची वाया गेलेली कार्टी..." त्या मुलांसोबत काहीही माहिती नसताना त्या मला फायर करत होत्या.. नी मी मनातल्या मनात हसत होते कारण कालची मी अशीच होते... कट्ट्याला आणि त्या मुलांना चुकीचं समजणारी... पण त्या दिवशी सकाळी सकाळी आदित्यने कट्ट्यावर मला बोलावून माझ्यावर खरच उपकार केले... हे असं म्हणायचं कारण म्हणजे त्यानंतर कट्टा आणि कट्टावासी इतरजण हे माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेले....


त्या दिवसानंतर माझी रोजची सकाळ कट्ट्यावर उगवू लागली... आमच्या वर्गातले म्हणजे आदित्यचा कंपू सोडला तर फारसं कुणीच त्या कट्ट्याकडे फिरकायचं नाही... आणि मुली तर नाहीच नाही... पण हा मेन सर्कलचा कट्टा सोडला तर असे अनेक कट्टे FC मध्ये आहेत आणि सुख समाधानाने नांदते गाजते आहेत याचा लौकरच शोध लागला... आणि मग त्यातच आमच्या department च्या बाहेरच्या एका पारावर आमचा कट्टा स्थापन झाला... (म्हणजे कट्टा तिथेच
होता पण त्यावर आमच्या gang ने बसायला सुरुवात केली.) अनेकांनी नाकं मुरडली आम्हाला त्या कट्ट्यावर विराजमान झालेलं बघून!!! पण who cares??? च्या थाटात आम्ही "कट्टा संप्रदायी" माणसांनी आमचा दंगा आणि कट्टा अविरत सुरु ठेवण्याची शपथ घेतली... आता या संप्रदायात ४-५ मुलं आणि मी एकटीच मुलगी अशी असमानता होती पण नाविलाज को क्या विलाज?? त्यानंतर रोज लेक्चर बुडवून कट्ट्यावर बसणे, एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढणे, येणा-या जाणा-या लोकांची टर उडवणे असे भरपूर प्रकार आम्ही मन लावून केले... कॉलेजला जायचं म्हणजेच कट्ट्यावर जायचं हा आणि एवढाच अर्थ होता त्यावेळी... नवं नवं कॉलेज लाईफ आम्ही सुरु केलं तेच मुळी या कट्ट्याच्या साक्षीने!!! मग हळूहळू कट्ट्यावर "उच्चवर्णीयांची" (पक्षी: अभ्यासू लोक...) अधून मधून जाणवेल न जाणवेल अशी हजेरी लागू लागली. आणि कट्ट्याला एक प्रकारचं अभ्यासू वलय मिळायला लागलं... याचा आम्हा "बहुजन" समाजाला झालेला महत्वाचा फायदा म्हणजे कुणाची कुठली assignment पूर्ण झालेली आहे, ती lab मधल्या कुठल्या PC वर आहे अशी मौलिक माहीती विनासायास मिळू लागली. अधिक त्यांच्या पूर्ण झालेल्या नोटस, वर्गात कुठल्यासरांनी काय शिकवायला चालू केलय, कुठला पोर्शन almost संपत आलाय, कुठली surprise test कधीं आहे या आणि अश्या सगळ्या बातम्या आमच्यापर्यंत "सबसे तेज" पोहचायला सुरुवात झाली... पण हळूहळू या गटातले मेम्बर्स फुटीर होऊन आमच्या संघाला मिळू लागले आणि वर्षाखेरीला "उच्चवर्णीय" जमातीत १०-१२ च अपवाद उरले... (त्यामध्येच माझ्या क्रमांक १ ते ३ मैत्रिणी पण होत्या.) पण मी मात्र हे सगळं transition अगदी मनापासून एन्जॉय केलं... लेक्चर बंक करणे, proxy लावायला सांगणे, कॉलेजमागच्या अण्णाच्या टपरीवर कटिंग मारणे या एके काळी माझ्या मते टपोरी वर्गात मोडणा-या गोष्टी मी अगदी मनसोक्त जगले... याच कट्ट्यावर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होई. अगदी शिवाजीपासून ते ह्रिथिक पर्यंत सगळ्या गोष्टींचं अगदी व्यवस्थित ज्ञान मिळे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून, अगदी विदेशातूनही शिकण्यासाठी आलेली जनता हमखास भेटायची एकमेव जागा म्हणजे हा कट्टा...!!! त्यामुळे आपोआपच वेगवेगळ्या गोष्टींवर वाद विवाद होणे, वेगवेगळ्या भागांची माहीती मिळणे... हे आणि असे प्रकार कट्ट्यावर रोज घडत... माझा एक मित्र होता.. आसामचा... त्याने आसामच्या प्रत्येक भागाची इतकी सखोलपणे माहीती पुरवली होती की आमच्यातले कित्येक जण आसामला न जाता सुद्धा तिथे गाईड म्हणून आरामात काम करू शकले असते... हे भौगोलिक ज्ञान वर्गात बसून थोडीच मिळणार होते.... :)

त्यानंतरच्या एकंदरीतच संपूर्ण शैक्षणिक कालखंडात "कट्टा" हा फक्त "झाडाभोवती बांधलेला दगडी पार" न राहता आमच्या चिमुकल्या कॉलेज विश्वाचं एक सांस्कृतिक, अभ्यासू, आध्यात्मिक (हो.. हो... बरोबर वाचताय....), साहित्यिक, पर्यटनविषयक, चर्चा केंद्र झाला होता. तिथेच असंख्य ट्रेक्स चे प्लान झाले, सगळ्या पिक्चर्सची यथेच्छ चीडफाड झाली, क्रिकेटपासून ते कबड्डीपर्यंत प्रत्येक खेळावर मौलिक मते देण्याचे सत्कार्य झाले, जीवाभावाचे मित्र भेटले... (हो माझं मैत्रिणींशी तसा कमीच जमत..) या कट्ट्याने असंख्य प्रेमकहाण्या पाहील्या, काही एकतर्फी, काही दोन्ही बाजूनी तर ब-याच "सगळ्या" बाजूनी.. :) :) संध्याकाळच्या निवांत क्षणी अनेक प्रेमींनी याच्याच साक्षीने मनातल्या सगळ्या गोष्टी बोलल्या, अनेकांची तुटलेली मनेही याच कट्ट्याने सांधली. नवीन नवीन आलेल्या, बुज-या लोकांना आपल्यात सामावून घेतलं या कट्ट्याने, तर छोट्या छोट्या कारणांनी मारामारीपर्यंत गेलेले "जय आणि वीरू" पण पाहिले. याच कट्ट्यावर बसून आम्ही आमच्या भविष्याचे स्वप्न पाहिले.


कुठून तरी एक जिद्द यायची या कट्ट्यावर बसल्यावर... वर्षानुवर्षे एकाच वर्गात बसणारे महाभाग "यार बहोत हो गया, अबकी साल maths clear करकेही रहूंगा" अशी भीष्मप्रतिज्ञा घ्यायचे, तर जन्मल्यापासून मेरीट लिस्ट मध्ये यायची सवय असलेले प्राणी internal ला एक मार्क कमी का पडला म्हणून ढसाढसा रडायचे ते ही याच कट्ट्यावर.!! प्रत्येकाच्या खिशाचा अंदाज घेऊन मग टपरीवर वडापाव खायला जायचा प्लान करणारे आणि "चल बे, ५ हजार से कम मे भी कभी पार्टी होती है क्या??" म्हणून हजार हजार रुपये असेच उडवणारेही हाडाचे कट्टेकरच असायचे...!!! किती पिढ्या आल्या आणि गेल्या... आमच्या कट्ट्याने असे किती विद्यार्थी, किती ग्रुप्स, किती कहाण्या पाहील्या असतील......


आज संध्याकाळच्या शांत वातावरणात आमचा शांत पडलेला कट्टा दिसला की असं वाटतं "अरे कट्ट्याला बोलता यायला पाहिजे होतं... काय काय नि किती किती गप्पा मारल्या असत्या न त्याने..." घरातले सगळ्यात वयस्कर आजोबा आजी जसे कौतुकाने आपल्या नातवंडांच्या लहानपणच्या गोष्टी कश्या सांगतात, तसच काहीसं बोलला असता आमचा कट्टा!!!! पिवळ्या लाईटसच्या प्रकाशात वयस्कर दिसणारा आमचा कट्टा.... छे!! कट्ट्याला का वय असणारे?? उद्या आम्ही म्हातारे झालो तरी नव्या नव्या ताज्या दमाच्या चेह-यांनी गजबजून उठेल आमचा कट्टा!!! आणि परत तिथे नव्या चर्चा, नव्या गोष्टी....!!!


आज आमचे सगळे कट्टेकर इकडे तिकडे पांगले आहेत. वर्षानुवर्षे गाठी भेटी होणं दुरापास्त होऊन बसलंय. प्रत्येकाची क्षेत्र वेगळी, जागा वेगळ्या... पण
काहीही असलं तरी आमच्यामध्ये सामाईक गोष्ट तीच आहे.... "आमचा कट्टा!!!" म्हणूनच मला खात्री आहे अश्याच एखाद्या हळव्या क्षणी कट्ट्याच्या आठवणी जाग्या होत असतील. मग एकमेकांना फोन केले जातात... "अरे यार भेटून बरेच दिवस झालेत नाही??? चला एक GTG ठरवूयात...." आणि सगळे बेत ठरतात फक्त कुठे भेटायचं? हे सोडून...... कारण जर चुकून एखाद्याने हे विचारलंच तर त्याला सामुहिकरित्या शाब्दिक मार मिळतो आणि आमच्यातलाच एक जण ओरडतो... "अरे माकडा, कुठे म्हणून काय विचारतोस??? आपल्या कट्ट्यावर....."

-स्वाती......

४ टिप्पण्या: