मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

एक प्रवास... "माझ्या"पासून "आपल्या"पर्यंत!!!

मध्यंतरी फेसबुकवर माझे आणि माझ्या बहिण भावंडांचे जुने फोटो टाकत असताना अचानक एक गोष्ट लक्षात आली... कि माझे जितके "भरपूर" फोटो आहेत लहानपणीचे तितके "तिचे" नाहीत... अगदी सिलेक्टेड काही!! पण त्यातसुद्धा बाहुलीसारखी दिसणारी ती!! आणि मी अचानक flashback मध्ये गेले........

लहानपणी सगळं कसं माझ्या अवती भवती फिरणारं होतं!! मी केलेल्या प्रत्येक, एवढुश्या गोष्टीचं सुद्धा अगदी अख्ख्या चाळीला कौतुक असायचं!! आई, पप्पा, दादा, ताई, काका, काकू अगदी समोरच्या घरात राहणारे आजोबासुद्धा!! सगळ्यांचा लाडोबा असलेल्या मला तेव्हा फक्त मी आणि माझंच माहित होतं!! माझी आई, माझे पप्पा, माझी खेळणी एवढंच काय अगदी माझं घरसुद्धा!! माझ्यासाठी सगळ्या गोष्टी आवर्जून आणल्या जायच्या. "हा फ्रॉक गुड्डीला छान दिसेल नै??", "सगळं कसं घडा घडा म्हणून दाखवते....", "सतीशची पोरगी बाकी हुशार आहे हो..." या आणि अश्या असंख्य बालसुलभ कौतुकाची मला इतकी सवय झाली होती. माझे सगळे हट्ट पुरवले जायचे!! (म्हणजे तसे ते आत्ताही पुरवले जातातच पण तेव्हा "फक्त" माझेच हट्ट पुरवले जायचे...) पप्पांच्या गाडीवर बसायचा मान माझ्या "एकटीचा" असायचा!! उटी, मद्रास, तिरुपती अश्या सगळ्या सहलींना आई पप्पांसोबत फक्त मलाच जायला मिळायचं!! दादा, ताई लोकांना टुकटुक करून... मग तिथून आलं की सगळ्या फोटोत मी आणि मीच!!!!!

आणि असं सगळं सुरळीत चालू असताना अचानक एके दिवशी आईला दवाखान्यात घेऊन गेले. "आई आता गुड्डीसाठी छान छान दादा आणणार खेळायला!!" माझ्या काकूने माझ्या कानात सांगितलं!! "दादा आणणार म्हणजे कुठून आणणार???, त्याला आपल्याकडेच का यायचंय?? आपण ज्यांच्याकडून दादाला आणणार ते काय करतील मग?? त्यांना दादा कुठला???" या प्रश्नोपनिशदाची जरादेखील दखल न घेता घरातले सगळेजण नवीन पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीला लागले... इथेच माझ्या "एकछत्री" साम्राज्याला सुरुंग लागायला सुरुवात झाली. 

आणि मग एके दिवशी दवाखान्यातून बातमी आली... "मुलगी झाली!!" म्हणून.... काकू, आत्या, आजी सगळेजण दवाखान्यात गेले.... त्यानंतर धावपळ सुरु झाली... "यावेळी तरी मुलगा हवा होता ग!!" असं म्हणणा-या बायका आमच्या घरी येऊ लागल्या.. मला मात्र कुणीच दवाखान्यात चल असं म्हणालं नाही... :( "दादा येणार म्हणाली होती काकू, मग मुलगी कशी काय??" हा मला पडलेला प्रश्न कुणालाच विचारता येत नव्हता!! "पण मी असताना अजून एक मुलगी कशाला हवी?? आपण आईला भेटलो कि तिला सांगू आपण हि मुलगी देऊन एक दादा घेऊयात असं!!" हे माझा मनातल्या मनात ठरलं पण!! पण मला आईला भेटायला कधी घेऊन जाणार?? आता घरात असलेले सगळेजण फक्त नवीन बाळाबद्दलच बोलायचे. ती कशी गोरी पान आहे, कशी गोड दिसते... सारखं आपलं तेच कौतुक!! 

मग शेवटी एकदा काकू मला घेऊन दवाखान्यात निघाली.. संपूर्ण रस्ताभर नुसत्या सूचना!! "बाळाला लगेच हातात घ्यायचं नाही, हात पाय धुवायचे, आईजवळ जास्त वेळ बसायचा हट्ट करायचा नाही, तिथे आरडा ओरडा, पळापळ करायची नाही!!!" मी इतक्या सूचना ऐकूनच दमून गेले होते. "काय त्या बाळाला इतकं जपायचं?? आणि म्हणे आईजवळ जायचं नाही.. माझ्या आईजवळ मी जायचं नाही.... :(" या विचारानेपण रडू फुटलं मला. मग काकू म्हणाली होती, "अगं ती तुझी बहिण आहे न.... मग आता तिला तूच जपायचं!!" 

सारसबागेजवळच्या दवाखान्यात एका खोलीत नेलं मला! तिथे एका कॉटवर आई बसली होती आणि तिच्या शेजारी आजी. माझी आई किती आजारी दिसत होती... तिला खूप सारी इंजेक्शन लावली होती... मला त्या बाळाचा इतका राग आला!! मग आईने हळूच मला जवळ बोलावलं आणि तिच्याजवळ दुपट्यात गुंडाळून ठेवलेलं छोटुस बाळ दाखवलं!! "हि तुझी छोटी बहिण!!" असं सांगून आईने हळूच माझा हात हातात घेतला आणि त्या बाळाच्या गालाला लावला... :) इतकं गोड, इतकं मऊ मऊ!!! त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं का?? माझ्या मनात अजून काय काय आलं?? हे नाही आठवत पण त्या क्षणानंतर मी त्या बाळाला, नाही नाही, माझ्या बहिणीला स्वत:पासून कधीच लांब नाही केलं!!! 

हे सगळं मी अनुभवलं तेव्हा मी ४ वर्षांची होते!!! (कदाचित हि आणि अशीच वाक्य नसतील तेव्हा माझ्या मनात पण एक मात्र नक्की भावना हीच होती.... :) ) त्यानंतर मी किती तरी वेळ रडत होते... कारण मला तिला हातात घ्यायचं होतं आणि मोठे कुणी मला तिला हात पण लावू देत नव्हते. पण शेवटी कुणालातरी माझी दया आली असावी... त्यांनी तिला माझ्या हातात दिलं आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकते.. त्याक्षणी मला वाटलं कि मी जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट माझ्या हातात घेतली आहे!!! "माझी बहिण!!" :)

अचानक मी "ताई" झाल्याचा साक्षात्कार झाला सगळ्यांना!! (मलासुद्धा!!) आणि मग तिचं मोठं होणं, पालथं पडणं, रांगायला लागणं, बोलायला लागणं या सगळ्या सगळ्या गोष्टींचा माझ्यासाठी सोहळा झाला. नाही म्हणायला तिचा राग पण खूप यायचा जेव्हा तिच्याकडे लक्ष नाही दिलं म्हणून मला मार बसायचा आईचा तेव्हा!! पण नंतर शाळेतून आल्यावर हसणारी, खेळणारी ती बघून मी परत तिच्याजवळ जाऊन खेळायला लागायचे. शाळेतसुद्धा तिच्या सगळ्या गमती-जमती सांगताना आणि "माझी छोटी बहिण आहे न" असं म्हणताना मी खूप मोठी झाल्यासारखं वाटायचं!! चालायला लागल्यावर ती पडली कि मी तिच्याजवळ जाऊन जमिनीला "हात ग!! आमच्या टीनुला मारते" असं करून जमिनीला मारलं कि टाळ्या पिटून हसायला लागायची ती!! तिचं ते निरागस हसणं आणि माझ्यावरचा तिचा विश्वास यासाठी मी आजदेखील जाऊन जमिनीला "हात ग!!" करायला तयार आहे. :)

आम्ही शाळेत जायला लागलो आणि लुटुपुटूची भांडणं तक्रारींमध्ये बदलली. माझ्याजवळ असलेली वस्तू तिला हवी असायची. मग आरडा ओरडा, मारामारी, वाद विवाद!! "मला शाळेत सगळेजण ताईची बहिण म्हणून ओळखतात :(" रडवेला चेहरा करून केलेली ही तिची तक्रार मला सुखावून जायची. :) सोसायटीमध्ये खेळताना माझ्याच टीममध्ये येण्यासाठी रडणारी ती, माझं कुणाशी भांडण झालं की "मला पण नाही खेळायचं त्यांच्यात" असं म्हणून माझ्या मागे घरी निघून येणारी ती, आई पप्पा मला ओरडले की मला शांतपणे माझी चूक समजावून सांगताना माझ्यापेक्षा लहान असूनही माझी "ताई" होणारी ती, शाळा-कॉलेजमध्ये घडणा-या रोजच्या घटना अगदी इत्थंभूत वर्णन करून सांगणारी ती.. माझ्या अनुभव विश्वाला प्रत्येक क्षणी समृद्ध करत गेली.

आज मागे वळून पाहिलं की जाणवतं.. किती काही शेअर केलं तिच्याशी!!! अगदी कॉलेजमधल्या मूर्ख भांडणापासून ते माझ्या प्रेमातल्या हळव्या क्षणांपर्यंत!!! त्याने मला लग्नासाठी विचारलं तेव्हा सगळ्यात  आधी विश्वासात घेऊन तिलाच तर सगळं सांगितलं मी!! आणि तिने ते समजून घेतलं... आणि असं समजून घेतानाही तिच्यातली एक लहान, निरागस मुलगी सतत जपली.. ऑफिसच्या वैतागातून घरी आलं की "ताई.." म्हणून दार उघडणारी ती पाहीली की सगळा वैताग निघून जातो आणि पुढच्याच क्षणी वादाला सुरुवात होते ही गोष्ट वेगळी.. :)

खूप खूप काही सांगता येईल तिच्याबद्दल.. तिच्यासाठी!!! पण सध्या फक्त एवढंच!! हे जमलंय की नाही माहित नाही... सगळ्यांना आवडेल की नाही माहित नाही... पण तिला नक्की कळेल, आवडेल.... या हृदयीचे, त्या हृदयी घालण्याचा हा एक प्रयत्न!!! :)

"माझ्या"पासून सुरु झालेला हा प्रवास "आमचा" होऊन राहिला आहे!!!! :) त्यादिवशी मानेखाली हळुवार आधार देऊन हातात धरलेली ती बाहुली आता माझ्या भावविश्वाचा आधार बनून राहिली आहे.... :)

-स्वाती....

५ टिप्पण्या: