मंगळवार, २५ मे, २०१०

जीव दंगला, गुंगला, रंगला असा....!!!

"जीव दंगला, गुंगला, रंगला असा....!!!" कानात गाणं चालू आहे आणि मनात त्याचे विचार... नकळतच कधीतरी मन त्या गाण्यात मला आणि त्याला पाहू लागतं आणि मग सुरु होते ती एक असह्य तगमग!!! अनिवार ओढ लागते त्याची आणि त्याच्या असण्याची... गाण्यातला पाऊस दाटून राहतो माझ्या सभोवती.. आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यात... हरिहरनच्या आवाजातली आर्तता आणि श्रेयाच्या आवाजातली व्याकुळता उतरत जाते खोलवर कुठेतरी...!!! तिथेच व्यापून राहिलेला असतो तो.. अथांग...!!!त्याचा ध्यास लागणं हे माझं प्राक्तनच असावं जणू... गहिवरला श्वास अजून कुठेतरी अडखळतो आणि मग सगळं सगळं धूसर होत जातं. श्रेया गातच असते "पैलतीरा नेशील साथ मला देशील, काळीज माझं तू!!!" आणि मग त्या प्रत्येक वाक्याशी स्वत:चं नातं ताडून बघते मी... असाच आधार वाटतो मला त्याचा, त्याच्या असण्याचा.... त्याची साथ असेपर्यंत मला कुठल्याही ढगाळ वातावरणाची, रुढींची काळजी नाही... तो असेपर्यंत माझं माझ्याशी असलेलं नातं तसंच अस्पर्श राहील याची खात्री देतो तो मला.... मी त्याची बनून जगत राहीन आणि सुख भरतीला येईल....


असंच होतं आज काल माझं... कुठलंही गाणं लागलं की त्याची आठवण होणं अगदी स्वाभाविक होऊन बसतं.. मग ते संदीपचं "तुझे नी माझे नाते काय??' असो किंवा अजय अतुलचं "स्वर्ग हा नवा" असू दे... आणि मग सुरु होतो एक खेळ माझा माझ्याशीच!!! सगळे सगळे क्षण आठवतात... त्याच्यासोबतचे... मनापासून बेधुंद जगलेले.... आणि मग हळूहळू माझ्याभोवती एक कोश तयार होतो त्यांचा... मी आणि तोच असतो त्या कोशात.... तो माझ्यासोबत हसतो, रुसतो... माझ्या खोड्या काढतो... मला हसवतो... आणि मग माझ्याकडे बघणारे मित्र मैत्रिणी हसतात मला... वेडी म्हणतात... बरोबर आहे, उगीचच स्वत:शीच हसणा-या मला पाहून दुसरा विचार काय येणार न??? पण मला त्या कशाशीच तमा नसते. मी असते तशीच त्याच्या खांद्यावर डोके ठेवून त्याच्या कानात कुजबुजणारी..!!! एका वेगळ्या जगात रमलेली....


खरच जेव्हा त्याने कामानिमित्ताने काही दिवस त्याला माझ्यापासून लांब राहणे अपरिहार्य आहे असे सांगितले तेव्हा मुसमुसून रडले होते मी... भांडले होते स्वत:शीच... कारण एक मन म्हणत होतं कि तो त्याच्या आवडत्या क्षेत्राकडे चालला आहे... तू उगाच त्याचा तिकडे जाण्याचा क्षण अजून अवघड करू नकोस... आणि हिरमुसली होऊन बसून राहिले होते... कारण त्याच वेळी दुसरं मन फक्त लांब राहण्याचा काळ मोजत होतं.... इतकी वर्ष??? हाच एक विचार बाकी सगळ्या सगळ्या गोष्टीना खोटं पाडत होता... पण त्याच्यासमोर यातलं एक अवाक्षरही न उच्चारता त्याला "तू जा.. मी वाट पाहीन" असं शांतपणे सांगितलं होतं!! आणि त्या क्षणापासून सुरु झाला हा प्रवास.... त्याचा त्याच्या ध्येयाकडे आणि माझा माझ्याकडून माझ्याकडे... त्याच्या नसण्याची सवय होता होता कित्येक रात्री उशी भिजवली आहे... "कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे...." या गाण्यातला शब्दन शब्द जगत होते मी... तो होता सतत माझ्याजवळ, माझ्यासोबत... पण मनाने... एखाद्याच्या असण्याची इतकी आतुरता, इतकी गरज एखाद्याला असू शकते??? नाही सापडत याचं उत्तर... मग नुसते प्रश्न, प्रश्न फिरत राहतात माझ्या सभोवती... ना त्याला सांगू शकते, न लपवू शकते अश्या द्विधेत सापडते... मनात कुठेतरी माहित असतं कि या सगळ्यात तो आहे माझ्यासोबत... जे मी इथे सहन करतेय तेच तो तिथे....


पण मग मनात परत तोच सनातन प्रश्न... या इथे आणि तिथेचा अंत कधी होणार?? पाहिलेली इतकी स्वप्नं... मनातच रचलेले इतके सगळे मनोरथ... हे सगळं कधी होणार पूर्ण? पण कुणाला विचारायचे हे सगळे प्रश्न... मग ज्या गाण्यांनी हे सत्र सुरु केले असते त्या गाण्यांनाच परत शरण जाते... आणि परत संदीप खोडकरपणे सांगू लागतो "प्रेमात म्हणे, कुणी हुरहुरते, कुणी मोहरते राणी" आणि मग मी त्याला गालातल्या गालात हसून दाद देते आणि स्वत:ची हुरहूर आणि डोळ्यातील काहूर हळूच निपटून टाकते...!!!!!!
 
- स्वाती....