गुरुवार, १० जून, २०१०

कट्टा....!!!

आत्ता नक्की दिवस कोणता होता, वेळ कोणती होती ते आठवत नाही.... पण २००३ सालातली कुठली तरी एक दुपारची चांदण्याची वेळ होती एवढं आठवतय.. जेव्हा माझी पहिल्यांदा त्याच्याशी ओळख झाली. स्थळ:फर्ग्युसन कॉलेज, पुणे-२. दादासोबत BCS चा फॉर्म भरण्यासाठी मी चालले होते. कॉलेजच्या गेट मधून आत गेल्या गेल्या समोर एक सुंदर बिल्डींग (अगदी जुन्या सिनेमात खपून जाईल अशी...) त्यासमोर एक सुंदर सर्कल (त्यात कारंज्यासारख काहीतरी दिसत होतं...) आणि त्या सर्कलच्या जवळच असलेला "तो"!!! बापरे त्याचं पहिलं रूप पाहूनच घाबरले होते मी.... त्याच्या आसपास जमलेली मुलं-मुली आणि त्यांच्या एकेक त-हा पाहून आपल्याला नाही बा यायचं इथे... असा मी मनातल्या मनात ठरवलं!!! पण हे दादाला कसं काय कळलं कुणास ठाऊक?? मला हळूच म्हणाला तो, "गुड्डी याचा तुझ्याशी जास्त संबंध येणार नाहीये!! हे नुसतं वरवरचं आहे.. खरं FC याहून खूपच वेगळं आहे..." आणि मी शांतपणे दादाच्या मागून चालू पडले... खरंतर त्याला पाहून एक क्षण भीती वाटली हे खरंय पण मी थोडीशी हुरळले पण होते... भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्याच्याजवळ बसलेला तो ग्रूप... बर्मुडा घातलेली, झिप-या वाढवलेली, काळे काळे टी शर्ट घातलेली आणि हातात गिटार घेऊन काहीतरी अगम्य भाषेत गाणारी मुले, त्यांच्या त्या बर्मुडा पण  मोठ्या वाटतील एवढे लहान स्कर्ट घातलेल्या २ मुली... अरे ही असली गर्दी आहे या कॉलेजमध्ये...(हो, गर्दीच!! कारण तेव्हा Croud या शब्दाचा परिचय व्हायचा होता... आणि ज्या ग्रूपला पाहून मला भीती वाटली होती... तो नुसता Croud नाही तर तिथला coolest आणि happening croud होता हे अगाध ज्ञान मज अडाण्याला कुठून बरं असणार?? जाऊ दे बरच पाल्हाळ लागतंय!!) तर मी काय सांगत होते, "माझा, हडपसरसारख्या लहान जागेतून आलेल्या मुलीचा इथे काय निभाव लागणार???" अशी भीती वाटत असतानाच, "तो" जणू मला मिश्किलपणे म्हणत होता की "इथे आल्यावर माझ्यापासून लांब राहणं मुश्कील ही नही, नामुमकीन है!!!" आणि मी त्याच्याकडे पहात पहात दादाच्या मागून चालले होते. 

शेवटी "मिळणार की नाही, मिळणार की नाही" या धाकधुकीमधून बाहेर येऊन मला FC ला प्रवेश मिळाला. पहिल्याच दिवशी, एका अनोळखी जगात, एका खूप भार्री कॉलेजमध्ये (हे मत तेव्हापासून आहे माझं... की FC इतकं भार्री कॉलेजच नाहीये...) मी जवळजवळ भांबावलेल्या अवस्थेत उभी असताना एक मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली "इथे Computer Science चं department कुठेय??" आली का पंचाईत?? अब एक अंधा दुसरे अंधे की क्या मदद करेगा?? पण तरी मी तिला नेटाने "चल मी पण तेच शोधतेय" असं म्हणाले. आणि आम्ही दोघींनी त्या department चा शोध लावला... (कोलंबसला अमेरिका शोधल्यावर काय आनंद झाला असेल असा आनंद मला ते department, त्या department मधला माझा वर्ग आणि त्या वर्गातली माझ्यासारखीच येडी दिसणारी पोरं-पोरी पाहून झाला.... :)) चला, आपल्यासारखेच अजून भरपूर जण आहेत... हा दिलासा मिळाल्यावर एकेकाशी बोलणे, ओळखी करून घ्यायला सुरुवात करणे अश्या धामधुमीत पहिला दिवस संपला... घरी जाताना परत त्याच ठिकाणी "तो" दिसला.. एकटाच!! "अरे आज इथे कोणी नाही वाटतं. नाहीतर सारखं इथे अख्ख्या FC मधली टपोरी लोक पडीक असतात.." ती माझी नवी मैत्रीण वय वर्षे एक दिवस सांगत होती. (हे वय तिचं नसून आमच्या मैत्रीचं आहे. सुज्ञास सांगणे न लगे) हे ऐकून त्याच्याबद्दलची भीती जाऊन आता तिथे हळूहळू तिरस्कार यायला लागला होता... 


दुस-या दिवशी कॉलेजमध्ये जायच्या आधी एका नवीन मित्राशी ओळख झाली.. आदित्य... तो माझ्या मावशीच्या शेजारीच राहणारा होता आणि माझ्याच वर्गात होता... त्यादिवशी कॉलेजमध्ये गेल्या क्षणी समोर दिसलेलं दृश्य पाहून मला धक्काच बसला. "अरे हा आदित्य टपोरी आहे?? घरी तर किती साळसूद वाटत होता..." या धक्क्याच कारण म्हणजे आदित्य चक्क "त्याच्या" इथे बसून इतर मुला-मुलींशी बोलत होता, हसत होता, टाळ्या देत होता... आणि मी आदित्यने मला ओळखू नये, आणि ओळखलच तर किमान ती दाखवू नये यासाठी शक्य तितक्या लौकर तिथुन जायचा प्रयत्न करत होते.. इतक्यात पाठून हाक आली... "ए स्वाती... कशीयेस??" "मी बरीये आदित्य.. आणि मला परत असं ओरडून हाक मारायच्या फंदात पडू नकोस... मला तुझ्यासारख्या मुलाशी बोलायचं नाहीये" हे सगळं असंच "कंसात" बोलून मी त्याला तोंडावर "हाय, अरे सॉरी मी तुला पाहिलंच नाही... कसा आहेस??" असं म्हणून टाकलं. "मी मस्त.. बस ना इथं गप्पा मारुयात, लेक्चरला बराच वेळ आहे अजून.." आणि मला हो नाही म्हणायची संधी न देता त्याने मला त्याच्या त्या ग्रुपमध्ये ओढलं... (शब्दश:... तेव्हा मी बरीच बारीक होते... :)) आणि इथे माझी "त्याच्याशी" पहिली ओळख झाली.. तोच तो ज्याला पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हा त्याच्याबद्दल भीती आणि कुतूहल दोन्ही वाटलं होतं... आणि त्यानंतर "तो" माझा जिवाभावाचा सखा झाला... अरेच्या... तुम्हाला हा "तो" कोण ते सांगितलंच नाहीये न मी.... हा "तो" म्हणजे आमच्या कॉलेजचा "कट्टा"....!!!!


तर त्यादिवशी मला त्या कट्ट्यावर मुलांमध्ये बसून गप्पा मारताना पाहून माझी ती क्रमांक १ मैत्रीण आणि तिच्याचमुळे भेटलेल्या अजून २ मैत्रिणी यांनी ताबडतोब कोपरा सभा घेऊन मला सामुहिकपणे झापायच ठरवलं... कारण या कोलेजच्या मतलबी आणि संस्कारशुन्य जगात मला सांभाळण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर होती.... :) "स्वाती तू त्या कट्ट्यावर काय करत होतीस?? तुला माहित्ये कशी मुलं आहेत ती?? एक नंबरची वाया गेलेली कार्टी..." त्या मुलांसोबत काहीही माहिती नसताना त्या मला फायर करत होत्या.. नी मी मनातल्या मनात हसत होते कारण कालची मी अशीच होते... कट्ट्याला आणि त्या मुलांना चुकीचं समजणारी... पण त्या दिवशी सकाळी सकाळी आदित्यने कट्ट्यावर मला बोलावून माझ्यावर खरच उपकार केले... हे असं म्हणायचं कारण म्हणजे त्यानंतर कट्टा आणि कट्टावासी इतरजण हे माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेले....


त्या दिवसानंतर माझी रोजची सकाळ कट्ट्यावर उगवू लागली... आमच्या वर्गातले म्हणजे आदित्यचा कंपू सोडला तर फारसं कुणीच त्या कट्ट्याकडे फिरकायचं नाही... आणि मुली तर नाहीच नाही... पण हा मेन सर्कलचा कट्टा सोडला तर असे अनेक कट्टे FC मध्ये आहेत आणि सुख समाधानाने नांदते गाजते आहेत याचा लौकरच शोध लागला... आणि मग त्यातच आमच्या department च्या बाहेरच्या एका पारावर आमचा कट्टा स्थापन झाला... (म्हणजे कट्टा तिथेच
होता पण त्यावर आमच्या gang ने बसायला सुरुवात केली.) अनेकांनी नाकं मुरडली आम्हाला त्या कट्ट्यावर विराजमान झालेलं बघून!!! पण who cares??? च्या थाटात आम्ही "कट्टा संप्रदायी" माणसांनी आमचा दंगा आणि कट्टा अविरत सुरु ठेवण्याची शपथ घेतली... आता या संप्रदायात ४-५ मुलं आणि मी एकटीच मुलगी अशी असमानता होती पण नाविलाज को क्या विलाज?? त्यानंतर रोज लेक्चर बुडवून कट्ट्यावर बसणे, एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढणे, येणा-या जाणा-या लोकांची टर उडवणे असे भरपूर प्रकार आम्ही मन लावून केले... कॉलेजला जायचं म्हणजेच कट्ट्यावर जायचं हा आणि एवढाच अर्थ होता त्यावेळी... नवं नवं कॉलेज लाईफ आम्ही सुरु केलं तेच मुळी या कट्ट्याच्या साक्षीने!!! मग हळूहळू कट्ट्यावर "उच्चवर्णीयांची" (पक्षी: अभ्यासू लोक...) अधून मधून जाणवेल न जाणवेल अशी हजेरी लागू लागली. आणि कट्ट्याला एक प्रकारचं अभ्यासू वलय मिळायला लागलं... याचा आम्हा "बहुजन" समाजाला झालेला महत्वाचा फायदा म्हणजे कुणाची कुठली assignment पूर्ण झालेली आहे, ती lab मधल्या कुठल्या PC वर आहे अशी मौलिक माहीती विनासायास मिळू लागली. अधिक त्यांच्या पूर्ण झालेल्या नोटस, वर्गात कुठल्यासरांनी काय शिकवायला चालू केलय, कुठला पोर्शन almost संपत आलाय, कुठली surprise test कधीं आहे या आणि अश्या सगळ्या बातम्या आमच्यापर्यंत "सबसे तेज" पोहचायला सुरुवात झाली... पण हळूहळू या गटातले मेम्बर्स फुटीर होऊन आमच्या संघाला मिळू लागले आणि वर्षाखेरीला "उच्चवर्णीय" जमातीत १०-१२ च अपवाद उरले... (त्यामध्येच माझ्या क्रमांक १ ते ३ मैत्रिणी पण होत्या.) पण मी मात्र हे सगळं transition अगदी मनापासून एन्जॉय केलं... लेक्चर बंक करणे, proxy लावायला सांगणे, कॉलेजमागच्या अण्णाच्या टपरीवर कटिंग मारणे या एके काळी माझ्या मते टपोरी वर्गात मोडणा-या गोष्टी मी अगदी मनसोक्त जगले... याच कट्ट्यावर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होई. अगदी शिवाजीपासून ते ह्रिथिक पर्यंत सगळ्या गोष्टींचं अगदी व्यवस्थित ज्ञान मिळे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून, अगदी विदेशातूनही शिकण्यासाठी आलेली जनता हमखास भेटायची एकमेव जागा म्हणजे हा कट्टा...!!! त्यामुळे आपोआपच वेगवेगळ्या गोष्टींवर वाद विवाद होणे, वेगवेगळ्या भागांची माहीती मिळणे... हे आणि असे प्रकार कट्ट्यावर रोज घडत... माझा एक मित्र होता.. आसामचा... त्याने आसामच्या प्रत्येक भागाची इतकी सखोलपणे माहीती पुरवली होती की आमच्यातले कित्येक जण आसामला न जाता सुद्धा तिथे गाईड म्हणून आरामात काम करू शकले असते... हे भौगोलिक ज्ञान वर्गात बसून थोडीच मिळणार होते.... :)

त्यानंतरच्या एकंदरीतच संपूर्ण शैक्षणिक कालखंडात "कट्टा" हा फक्त "झाडाभोवती बांधलेला दगडी पार" न राहता आमच्या चिमुकल्या कॉलेज विश्वाचं एक सांस्कृतिक, अभ्यासू, आध्यात्मिक (हो.. हो... बरोबर वाचताय....), साहित्यिक, पर्यटनविषयक, चर्चा केंद्र झाला होता. तिथेच असंख्य ट्रेक्स चे प्लान झाले, सगळ्या पिक्चर्सची यथेच्छ चीडफाड झाली, क्रिकेटपासून ते कबड्डीपर्यंत प्रत्येक खेळावर मौलिक मते देण्याचे सत्कार्य झाले, जीवाभावाचे मित्र भेटले... (हो माझं मैत्रिणींशी तसा कमीच जमत..) या कट्ट्याने असंख्य प्रेमकहाण्या पाहील्या, काही एकतर्फी, काही दोन्ही बाजूनी तर ब-याच "सगळ्या" बाजूनी.. :) :) संध्याकाळच्या निवांत क्षणी अनेक प्रेमींनी याच्याच साक्षीने मनातल्या सगळ्या गोष्टी बोलल्या, अनेकांची तुटलेली मनेही याच कट्ट्याने सांधली. नवीन नवीन आलेल्या, बुज-या लोकांना आपल्यात सामावून घेतलं या कट्ट्याने, तर छोट्या छोट्या कारणांनी मारामारीपर्यंत गेलेले "जय आणि वीरू" पण पाहिले. याच कट्ट्यावर बसून आम्ही आमच्या भविष्याचे स्वप्न पाहिले.


कुठून तरी एक जिद्द यायची या कट्ट्यावर बसल्यावर... वर्षानुवर्षे एकाच वर्गात बसणारे महाभाग "यार बहोत हो गया, अबकी साल maths clear करकेही रहूंगा" अशी भीष्मप्रतिज्ञा घ्यायचे, तर जन्मल्यापासून मेरीट लिस्ट मध्ये यायची सवय असलेले प्राणी internal ला एक मार्क कमी का पडला म्हणून ढसाढसा रडायचे ते ही याच कट्ट्यावर.!! प्रत्येकाच्या खिशाचा अंदाज घेऊन मग टपरीवर वडापाव खायला जायचा प्लान करणारे आणि "चल बे, ५ हजार से कम मे भी कभी पार्टी होती है क्या??" म्हणून हजार हजार रुपये असेच उडवणारेही हाडाचे कट्टेकरच असायचे...!!! किती पिढ्या आल्या आणि गेल्या... आमच्या कट्ट्याने असे किती विद्यार्थी, किती ग्रुप्स, किती कहाण्या पाहील्या असतील......


आज संध्याकाळच्या शांत वातावरणात आमचा शांत पडलेला कट्टा दिसला की असं वाटतं "अरे कट्ट्याला बोलता यायला पाहिजे होतं... काय काय नि किती किती गप्पा मारल्या असत्या न त्याने..." घरातले सगळ्यात वयस्कर आजोबा आजी जसे कौतुकाने आपल्या नातवंडांच्या लहानपणच्या गोष्टी कश्या सांगतात, तसच काहीसं बोलला असता आमचा कट्टा!!!! पिवळ्या लाईटसच्या प्रकाशात वयस्कर दिसणारा आमचा कट्टा.... छे!! कट्ट्याला का वय असणारे?? उद्या आम्ही म्हातारे झालो तरी नव्या नव्या ताज्या दमाच्या चेह-यांनी गजबजून उठेल आमचा कट्टा!!! आणि परत तिथे नव्या चर्चा, नव्या गोष्टी....!!!


आज आमचे सगळे कट्टेकर इकडे तिकडे पांगले आहेत. वर्षानुवर्षे गाठी भेटी होणं दुरापास्त होऊन बसलंय. प्रत्येकाची क्षेत्र वेगळी, जागा वेगळ्या... पण
काहीही असलं तरी आमच्यामध्ये सामाईक गोष्ट तीच आहे.... "आमचा कट्टा!!!" म्हणूनच मला खात्री आहे अश्याच एखाद्या हळव्या क्षणी कट्ट्याच्या आठवणी जाग्या होत असतील. मग एकमेकांना फोन केले जातात... "अरे यार भेटून बरेच दिवस झालेत नाही??? चला एक GTG ठरवूयात...." आणि सगळे बेत ठरतात फक्त कुठे भेटायचं? हे सोडून...... कारण जर चुकून एखाद्याने हे विचारलंच तर त्याला सामुहिकरित्या शाब्दिक मार मिळतो आणि आमच्यातलाच एक जण ओरडतो... "अरे माकडा, कुठे म्हणून काय विचारतोस??? आपल्या कट्ट्यावर....."

-स्वाती......

मंगळवार, ८ जून, २०१०

आजची संध्याकाळ!!! (मीटिंग रूममधली....)


खरं तर हे जे काही मी लिहितेय ते illegal आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे...कारण खरं तर मला या मीटिंग रूम मध्ये "महत्वाच्या" मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे आणि ती रूम already इच्छुकांनी भरलेली आहे. त्यामुळे मला आणि माझ्याइतक्याच टुकार असलेल्या माझ्या मैत्रिणीला खिडकीच्या कट्ट्यावर बसायला जागा मिळाली आहे. ही कंपनी जॉईन केल्यापासून तसं हे आमचं टवाळ्या करण्याचा हक्काचं आणि आवडतं आसन आता त्याभोवती एक मीटिंग रूम नामक भयानक प्रकार बांधला गेल्याने नजरेच्या टप्प्याआड गेलंय. त्यामुळे आज अकस्मात त्याच ठिकाणी इतक्या official पद्धतीने जागा मिळाल्याने आम्ही मनातल्या मनात भांगडा केला... त्या ठिकाणी टेकल्यावर "सब पुरानी यादे ताझा हो गयी...!!" आणि ह्याचा पुरावा आम्ही दोघींनी एकमेकीना केलेल्या इशा-यातून मिळाला. :) मग आता सांघिक कामगिरीला सुरुवात.. मीटिंग रूममध्ये अगदी seriously बसलेल्या demotypes ची backbench वर बसलेल्या टवाळ कार्टयांप्रमाणे, हळूच टिंगल करताना आमचं लक्ष अचानक खिडकीबाहेर जातं आणि आईशप्पथ....!!!!!
दोघीजणी मनातल्या मनात "आहाहाहा...!!!" करून किंचाळलो हे चेह-यावर स्पष्ट दिसतंय.. (आम्हालाच... आमच्याच चेह-यावर!! बाकी कोणाला आमच्याकडे पाहायला फुरसत नाहीये इथे.) बाहेर काय सुंदर पावसाळी वातावरण आहे!!! संध्याकाळ झालेली आहे; त्यामुळे मंद केशरी रंगाचा शिडकावा झाल्यासारखा दिसतोय. नुकताच पाऊस पडून गेलेला असल्याने ओला झालेला रस्ता आणि त्याच्याच कडेला, टपरीवरचा मस्त कटिंग चहा मारत असलेले लोक!!! सगळे मला इथे बसल्या बसल्या स्पष्ट दिसताहेत. आणि त्यांच्या चेह-यावरच्या आनंदाची कल्पना केल्याने आमच्या ह्या रूममध्ये जळकट वास पसरल्याचा भास होतोय.... (वा... काय यमक जुळलंय?? वास-भास!! असा ठरवून जमत नाही हे... ते आतून यावं लागतं...म्हणजे कुठून ते नका विचारू....) 
तर मी काय सांगत होते... ह्म्म्म... संध्याकाळ... आणि त्यात आमच्या ऑफिसशेजारच्या बिल्डिंगमधील एका मोठ्या टेरेसवर कुणा हौशी मालक कम माळ्याने टेरेस गार्डन केली आहे... (हो... कपडे वाळत टाकण्याखेरीज ही याचा उपयोग करतात लोकं!!! सौ.(अर्थातच उचलेगिरी :) ): पु. ल.) त्या गार्डनमध्ये असलेल्या हिरवळीवर पावसाचे थेंब अजूनही अडकून राहिले आहेत. त्यावर अनवाणी पायांनी चालायची इच्छा अनिवार होते आहे!! अगदी "रिमझिम गिरे सावन" पासून ते "अबके सावन ऐसे बरसे" पर्यंत सगळ्या गाण्यांची उजळणी मनातल्या मनात चालू असतानाच....... "Swati , will u please elaborate more on this ??? " असा कुणीतरी म्हणतंय असा मला भास होतोय तेवढ्यात... तेवढ्यात माझ्या मैत्रीकर्तव्यपरायण सखीने मला जोरात ढोसून त्या पावसाळी, romantic वातावरणातून; रूममधल्या A /C च्या कुबट हवेत आणलं... (U too Brutus ???) :( खिन्न झालेय मी.... मग वेळ मारून नेण्यासाठी काहीच्या काही बडबडले.... (तिथल्याच एक दोन जणांची नावे घेऊन "as said by XYZ" म्हणून त्यांनीच मांडलेले मुद्दे परत सांगितले..... च्यायला हाकानाका :) :) ) आणि हुश्श परत खाली बसले.... Brutus ला बाहेर भेट मग सांगते असा दम दिला पाहिजे.....
मग परत मी त्या romantic वातावरणात आलेय..... असा वाटतंय अगदी आत्ता माझा अनिल कपूर येईल आणि "रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम, भिगी भिगी ऋत में तुम हम, हम तुम" सुरु करेल!!! आणि मग में पण त्याला "भिगी भिगी रातो में, मिठी मिठी बातो में, ऐसी बरसातो में कैसा लगता है???" असं खट्याळपणे विचारून हळूच त्याच्या मिठीत शिरेन!!! "अगं स्वाती, control कंट्रोल, कुठे बसलीयेस?? काय विचार करतेयस??" माझ्या मनातला Brutus सुरु झालाय. "शी बाबा.... या सुंदर वातावरणात इथे आतमध्ये बसून ह्या असल्या रुक्ष चर्चा करणं गरजेचं आहे का?" (आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील "its part and parcel of ur duty" ) सगळं मान्य आहे हो पण हा पाऊस आहे न त्याचाच दोष आहे हा सगळा!!!! नुसता तो येण्याची चाहूल जरी लागली न तरी मन वेडं होऊन उठतं.... मग या सगळ्या मिटींग्स, हे सगळे प्रोजेक्ट्स, सगळ्या टास्क शीट्स सगळं सगळं गेलं चुलीत म्हणत उठावं आणि मस्तपैकी "दूर दूर नभापार, डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे, गार गार पावसाचे घरदार" शोधात अंगावर "सरीवर सर" घेत हिंडत राहावं असं मला तरी वाटतं!!!!!!!!!!! तुम्हाला???

(त. टी.१ : एक अख्खा लेख संपत आलाय तरी मीटिंग संपायच नाव नाही घेत..... :( देवा नारायणा... किती रे असं illegal लिखाण करवून घेशील म्या पामराकडून???)
 त. टी.२ : आमच्या Brutus ने केलेला illegal लिखाण पण तिच्या ब्लॉगवर येईलच लवकर...!!!!)
- स्वाती......

सोमवार, ७ जून, २०१०

७ जून....

आज सकाळी आईने बिल भरायचं आहे... असा सांगून चेक हातात ठेवला. त्यावर आजची तारीख ७ जून २०१० लिहिताना हात जरासा थबकला. काहीतरी आठवतंय.... पण नेमकं काय? मनात काहीतरी सुरु झालंय त्या तारखेने.. पण नक्की काय शोधू पहातंय मन?? याच विचारात गाडी सुरु केली आणि ऑफिसकडे कूच केलं. जाताना पण मनात विचारांनी गर्दी केली; अगदी जशी शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही लहान मुलं प्रार्थनेला उभी राहताना करायचो न तशी...!!! आणि याच विचारासरशी कळलं.... ७ जून... पहिला दिवस... शाळेचा.... स्मित हेच तर आठवत होतं इतका वेळ....

लहानपणी माझ्या शाळेची सुरुवात ७ जूनलाच व्हायची. म्हणजे जरी ७ जूनला रविवार असला तरी वेळापत्रकावर शाळा ७ जूनलाच सुरु झालेली असायची.... आणि माझी शाळा तर त्याच्याही आधी म्हणजे १ जूनपासूनच!!! "पप्पा मला यावेळी नवीन दप्तर, नवे बूट आणि हो नवा पेन्सिलचा box पण हवाये." ही असायची माझ्या शैक्षणिक वर्षाची नमनाची वाक्यं!!! अर्थात वयानुसार आणि गरजानुसार लिस्ट बदलत गेली पण सूर एकंदरीत हाच राहिला. मग मागणी कितपत पूर्ण होतेय याचा आगाऊ अंदाज घेऊन मग केलेली आदळ-आपट, रडारड या सगळ्यांचा योग्य तो परिणाम होऊन अखेरीस शाळेला आनंदाने नवं दप्तर घेऊन दिमाखात जाणारी मी....शाळेचा पहिला दिवस म्हटलं कि हेच आठवत मला....

तेव्हा शाळा आणि पाऊस एकत्रच सुरु व्हायचे...!! ७ जून म्हणजे मॉन्सूनच आगमन अगदी ठरल्याप्रमाणे असायचं. किमान त्यादिवशी पावसाची एकतरी जोरदार चळक यायचीच. मला अजूनहि आठवतं; सकाळची शाळा असायची. आम्ही सगळी मुलं डबा खात असताना ढगांचा जोरदार गडगडाट व्हायचा, सगळीकडे अंधारून यायचं आणि मग धुवाधार पाऊस यायचा. खिडकीजवळच्या मुला-मुलींची दप्तर वाचवण्यासाठी धावपळ व्हायची. बाई वर्गात येऊन तिथल्या ट्यूब लाईट लावायच्या... त्या वयात त्या ट्युब्सच पण आकर्षण वाटायचं. आणि आम्ही सगळी चिल्लीपिल्ली त्या खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत बसायचो. आमचे मोठे दादा ताई लोकं मैदानावर जाऊन पहिल्या पावसाची मज्जा घ्यायचे. बाई स्वत: त्यांना घेऊन जायच्या पावसात. तेव्हा लौकर "मोठ्ठं" होण्यामागे ते एक प्रमुख कारण होतं "शाळेत जाऊन पावसात खेळायला मिळायला हवं म्हणून!!!"
हे झालं ३री-४थी नंतरच... जेव्हा शाळेत जाणं हा एक अति आनंदाचा भाग असायचा. पण त्याआधी शाळेत जाताना बाहेर काय पाऊस पडत असेल इतका पाऊस माझ्या डोळ्यात असायचा. जणू काही आई पप्पा मला काळ्या पाण्यावर पाठवतायेत अश्या अविर्भावात मी रडायचे. (हे अर्थातच पप्पांच्या आठवणीतलं वाक्य आहे) दप्तर फेकून दे, डबा सांड, हात पाय आपट हि आणि असली सगळी नाटकं करून मग शाळेत जायचे. (म्हणजे मला पाठवलं जायचं) पण एक होतं मी एवढं रडून पडूनसुद्धा आईने कधीच मला शाळेचा पहिला दिवस बुडवू दिला नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तिच्याकडे प्रतिहल्ला तयार असायचा... "दप्तर टाकलस, हे घे दुसरं दप्तर", डबा सांडला म्हणेपर्यंत आतून दुसरा डबा आणि पाण्याची बाटली हातात.. मग मी हताशपणे माझं चंबूगबाळ आवरून शाळेकडे चालायला लागायचे. (अंगणवाडी ते २री माझी शाळा घराला लागुनच होती.) तेव्हा शाळेत न जायचं एक हुकमी कारण म्हणून मला पावसाची प्रचंड मदत व्हायची. पप्पा मला सोडायला चालत यायला लागले आणि पाऊस सुरु झाला की मग मी रडकुंडीला येऊन "पप्पा मला नाही जायचं" असं म्हणायचे कि मग ते मला शेजारी असलेल्या काकाकडे घेऊन जायचे. मग काय आम्ही आमच्या मनाचे राजे. इतका वेळ "मला पावसात भिजून शेंबूड येईल ना गं आई!!" असं म्हणून रडणारी मी त्याच पावसात हुंदडत असायचे. मला तिथेच खेळताना पाहिलं की आई अजून ओरडायची. पण तेव्हा त्या पावसात खेळताना तिच्या चिडण्याच पण काहीच वाटायचं नाही. मग शाळेत आम्हाला बसवून ठेवण्यासाठी बालवाडीच्या आमच्या बाई वेगवेगळे प्रकार करायच्या. कागदी होड्या तयार करून बाहेरच्या डबक्यात सोडणे, कुणाची होडी जास्त वेळ तरंगते याची स्पर्धा लावणे (क्वचित त्या स्पर्धांचे निकाल एकमेकांना चिखलात पडून मारामा-या करण्यानेसुद्धा व्हायचे. होडीचं तर कधीच टायटेनिक झालेलं असायचं.) मग शाळेत गरम गरम पोहे, उपीट, शिरा असं जंगी बेत असायचा. (शासनाने खिचडी वाटप सत्कार्य हाती घ्यायच्या आधीपासून आमच्या बाई स्वत:च्या घरून सगळे सामान आणून स्वत: नाश्ता बनवायच्या शाळेत.) बाहेर पाऊस पडत असताना वर्गात एकमेकाजवळ बसून, थंडीने कुडकुडत असताना वेगवेगळ्या कविता म्हणत केलेला तो नाश्ता आजही आठवतो. शाळेतल्या पावसाची हि एक अजून सुंदर आठवण!!!

३री मध्ये मोठ्या शाळेत गेल्यावर सगळ्या गोष्टींच अजून अप्रूप वाटायला लागलं. पप्पांचा हात धरून शाळेत जाणारी मी, आता रिक्षात बसून अधिक जबाबदारीने शाळेत जायला लागले. आणि साक्षीला तो होताच!! नित्यनेमाने येणारा... मग काय "वोटरप्रूफ दप्तर" हा शाळेत नुकताच लागलेला शोध आपल्या घरी नाकारला गेल्यावर; "मग माझी वह्या पुस्तक भिजली तर मी काय करू???" या निरागस प्रश्नाला "प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये नीट ठेवून मिळालेली वह्या पुस्तके" हे उत्तर शिरोधार्य मानून मी "मोठ्या" शाळेत जायला लागले. नवा, नवा गुलाबी फुला फुलांचा रेनकोट घालून शाळेत जाताना जी धमाल यायची ती आज कारमध्ये बसून ऑफिसला जाताना कुठेतरी हरवली आहे.

नंतर मोठ्या वर्गात गेल्यावर पावसानंतरचा मातीचा सुवास, हवेत पसरणारा आल्हाददायक गारवा वगैरे गोष्टींशी परिचय झाला आणि लहानपणीच्या "आई पाऊस आला......" चं "पावसाची भूरभूर सुरु झाली...." मध्ये रुपांतर झालं. आता न्यायला रिक्षावाले काका येत नसत.. माझी मीच छानपैकी तयार होऊन नव्या को-या सायकलवर शाळेत जायला लागले. आता खूप मोठा बारदाना सांभाळत शाळेत जायची कसरत सुरु झाली. दप्तर, रेनकोट, डब्याची पिशवी, सायकल आणि मी!! त्यामुळे दर २-३ दिवसांनी भूमातेला साष्टांग नमस्कार ठरलेलाच असायचा. PT च्या दिवशी तर हालतच व्हायची. पांढरे बूट!! जे कितीही पाऊस पडत असला तरी पांढरेच राहायला हवेत असं आमच्या सरांचा आग्रह (की दुराग्रह??) असायचा. त्यामुळे त्यादिवशी आमच्या बारदान्यात अजून एका पिशवीची भर.... बुटांची पिशवी.. त्यादिवशी मात्र एरवीचा मित्र वाटणारा पाऊस शत्रू नं. १ असायचा. पण ते काहीही असलं तरी वर्गात बसलेलं असताना खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस पाहणे, त्याचे आतमध्ये येणारे चुकार थेंब हातावर झेलणे. या आणि अश्या अनेक गोष्टीनी माझं शालेय जीवन अगदी पावसावरच्या निबंधासारखं सुंदर केलं.

तेव्हा मातीचा वास, नव्या नव्या पुस्तकांचा वास आणि एवढेच काय पण नवीन घेतलेल्या नटराजच्या खोडरबरचा वास, बाईंबरोबर डबक्यातल्या पाण्यात खेळलेली डबा ऐसपैस, "चला मुलानो, पावसात भिजून येऊया.." म्हणणारे आमचे शिपाइकाका, एकमेकांच्या हाताला धरून; निसरड्या रस्त्याला घाबरत घाबरत केलेली वर्षा सहल....!!! हे सगळे निरागस क्षण असे माझ्या आठवणींच्या पेटीत बंद करून ठेवले आहेत त्या ७ तारखेने आणि ना चुकता त्या दिवशी येणा-या त्या पावसाने!!!

आज अचानक ७ जून २०१० तारखेने त्या पेटीचं कुलूप काढलं आणि सगळं कसं माझ्या डोळ्यांसमोर लख्ख उभं राहिलं!!! आज सकाळपासून ५-६ वेळा बाहेर जाऊन पाहिलंय; पण अजून तरी माझ्या लहानपणीच्या पावसाने हजेरी दिलेली नाहीये. "अरे शाळा सुरु झाली रे माझी.... ये ना आता तरी!!!" मुक्यानेच साद घालतेय त्याला.... पण मला माहितीये तो आत्ता येणार नाही... लहानपणीचा सवंगडी आहे माझा!! त्याची अट आहे "तेव्हा जशी यायचीस मैदानावर धावून तशी येणार असशील तरच येतो मी...." आणि मी मात्र माझ्या काचेच्या केबिनमध्ये बसून त्याला "माझा आत्ता एक Client call आहे रे... नाही जमणार!!" अशी मलाच नं पटणारी कारण देत जागेवरच बसून आहे.....!!!!!!

-स्वाती......