गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

काही आठवणी जाग्या करणारी गाणी...

जसं जसं आपण मोठं होत जातो तश्या आपल्या प्रायोरिटीज बदलत जातात. अनेक स्थळे, घटना, त्यांच्यांशी संबंधित व्यक्ती यांचे संदर्भ बदलत जातात. बदलत जातात फक्त; नाहीसे होत नाहीत. :) ते आतवर कुठेतरी खोल दडून बसतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक जागा, प्रत्येक माणूस!! फक्त आपल्याला हे लक्षात आहे हेच आपल्या लक्षात नसतं! आणि मग अश्या काही क्षणांचं कुलूप उघडण्यासाठी काही किल्ल्या असतात. एकत्र घालवलेल्या दिवसांचे फोटो.. एखादी घटना किंवा असंच काहीतरी. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ही किल्ली वेगळी असेलही कदाचित.. पण ती असतेच असते!! माझ्या बाबतीत म्हणाल तर असंख्य गाणी हा मला या जुन्या क्षणांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे... आता विचार केला तर योगायोगाचं आश्चर्य वाटतं पण अशी बरीच गाणी आहेत जी ऐकली कि मी एका विशिष्ट घटनेशी, काळाशी किंवा व्यक्तीशी जोडली जाते. आणि मग एखाद्या जुन्या पेटीसमोर बसून राहावं, त्यातून बाहेर पडणाऱ्या एकेका वस्तूने आठवणींवर पडलेली जळमटं अलगद दूर व्हावीत आणि सगळं लख्ख दिसू लागावं.. असंच होत आलंय माझं आजवर!!! या अश्याच गाण्यांना आठवण्याचा हा प्रयत्न....

आमच्या नवीन घराची वास्तूशांती होती. ९०-९१ सालची गोष्ट आहे. तेव्हा बेटा सिनेमा मधलं "कोयलसी तेरी बोली" हे गाणं खूप गाजलं होतं (खरंतर धक धक ची क्रेज जास्त होती, पण आमची वयं लक्षात घेता कोयलसी तेरी बोलीच "चार्ट-बस्टर" होतं!!) तर ते आमच्या घराच्या ग्यालरीमध्ये टेपवर लावलं जायचं आणि माझी मावसबहीण त्यावर नाच करायची. आजदेखील कुठेही बेटा किंवा ते गाणं लागलं तर माधुरी-अनिल कपूर न आठवता माझी ती मावसबहीण आणि वास्तू साठी जमलेल्या नातेवाईकांचा गोतावळा आठवतो. आणि मग मुंग्यांची रांग लागावी तसे एका पाठोपाठ एक तेव्हाच्या वेगवेगळ्या आठवणी समोर येत राहतात. परवा सहज ते गाणं लागलं तेव्हा माझ्या त्या बहिणीला म्हटलं "आठवतं का गं हे गाणं?" त्यावर तिने माझ्याकडे असं काही पाहिलं कि एकदम जाणवलं आपल्या फ्रिक्वेन्सीज वेगळ्या आहेत.. माझ्या आठवणीतलं हे स्टेशन तिच्या मनात नाहीये.

त्यानंतर आमच्या घरी जुना बाबांच्या जमान्यातला टेप जाऊन सीडी प्लेयर आला. अत्र्यांच्या खानदानातला पहिलाच सीडी प्लेयर ना.. त्यामुळे सगळ्यांनाच पहिलटकरणीच कौतुक. त्याबरोबर २ सीडी फ्री मिळाल्या होत्या. एक "देव माझा विठू सावळा" अशी पांडुरंगावरील 'अभंग' प्रेमाची आणि दुसरी "आशिकी" ही प्रेयसीवरील प्रेमाचे अभंग असलेली :) :) आमच्या घरातील बहुजन समाजाचा विठूरायापेक्षा आशीकीकडे ओढा अधिक... त्यामुळे दादाकडून शिकून घेऊन स्वत:हून सीडी प्लेयर लावून ऐकलेलं "मै दुनिया भुला दुंगा तेरी चाहत में" हे एक गाणं अजूनही आठवतं!! त्यावेळी मी आणि बहिणीने त्यावर केलेला बॉल डान्स... "पोरीच्या जातीला असं सारखं नाचणं-ओरडणं शोभतं का?" असं विचारून आत्याकडून मिळालेला प्रसाद. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कळत्या वयात जेव्हा या गाण्याचा वीडीओ पाहिला तेव्हा तेलकट चेहऱ्याची अनु अगरवाल आणि सुतकात असल्याचा चेहरा केलेला तो राहुल रॉय पाहून झालेला तीव्र दु:खावेग!! "दृष्टीआड सृष्टी" असं जुने जाणते लोकं का म्हणून गेलेत ते पटतं अश्यावेळी. असो... पण आज देखील ते गाणं ऐकलं की (पहायची हिम्मतच नाहीये बाबा) की तीच तावातावाने सीडी प्लेयरचं manual वाचून त्यानुसार ते गाणं लावायला तडफडणारी मी डोळ्यासमोर येते आणि नकळत ओठात हसू येतं.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

चांदणरात...!!

४ वर्षांपूर्वी University ची entrance exam देताना सुचलेली कविता... तेव्हाच, त्याच hall ticket वर लिहून काढलेली.... (परीक्षेचा निकाल काय लागला ते सुज्ञास सांगणे न लगे.... ;) ) 

चांदणरात.... तुझी चांदणसय,
जणू गारव्यात, मारव्याची साधलेली लय...!!!
चांदणरात.... रातराणीचा गंध,
तुझ्या आठवणींचा डवरला निशिगंध...!!!
चांदणरात.... स्वप्नाळली निद्रा,
हातांच्या आरशात, तुझीच मुद्रा...!!!
चांदणरात.... तुझी आठवण,
जणू माझिया ओंजळीत ता-यांची साठवण...!!!
चांदणरात.... विरला सारा शीण,
चांदण्याच्या स्पर्शाने उसवलेली वीण...!!!
चांदणरात.... पहाटेवर लवंडलेली,
शुक्राची चांदणी क्षितिजावर कलंडलेली...!!!
अशी चांदणरात.... अशी तुझी चांदणसय....
जीवाला वेड लागेल नाहीतर काय??? 
-स्वाती....

तो.....

तो प्रत्येकीच्या जीवनात असतोच या ना त्या रूपाने...
कधी वळवाचा पाऊस असतो, कधी स्वप्नांची कूस असतो...
कधी भावनांचा पूर असतो, कधी सप्तकातला सूर असतो...
कधी कातर संधिप्रकाश असतो, कधी तिला सादवणार निळभोर आभाळ असतो...
कधी जमलेल्या कवितेची मैफिल असतो, कधी नुकतीच जन्मलेली गजल असतो...
कधी आयुष्याचा संगीत तो असतो, तिने गायलेलं प्रत्येक गीत तो असतो...
ती त्याची सावली तर तिची काया तो असतो, तिने उभारलेल्या घरकुलाचा पाया तो असतो...
झंकारला तर षडज, छेडला तर साज असतो...
तिचा मित्र, तिचा सखा, तिच्या सादेला मिळणारा प्रतिसाद असतो...
तो असतो नागमोडी धावणा-या रस्त्यामध्ये, तो असतो बेभान घोंगावणा-या वा-यामध्ये...
तिच्या स्वप्नात जागणारा तो असतो, तोच असतो रात्रीला सोबत करणा-या ता-यांमध्ये...
ती जितकी व्यापक, तितकाच अथांग तो असतो...
सूर्याची दहाकातही त्याच्यामध्ये, अन पौर्णिमेचा चंद्र शांतही तो असतो...
तो असतो इतका अंतर्भूत, कि त्याचा असणं नाकारता येत नाही...
त्याचं अथांग अस्तित्व तिला स्वीकारू म्हणता, स्वीकारता येत नाही...
स्वीकारलं किंवा नाकारलं तरी, प्रत्येकीजवळ तो असतो जपलेल्या श्वासासारखा...
ती एकदातरी अनुभवतेच त्याला, तो असतो एका आभासासारखा!!!!!
..... कारण प्रत्येकीच्या आयुष्यात असतोच "तो" या ना त्या रूपाने!!!!
-स्वाती...... 

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

रात हमारी तो.....!!

सांजावून आलंय बाहेर!! कातरवेळ उभी उंब-याशी!! तुझ्या येण्याची अनामिक चाहूल मनात... पण का हुरहुरतंय माझं मन, जरी ठाऊक आहे तुझं येणं निश्चित आहे!! जशी गेलीस भल्या पहाटे मला दूर लोटून, तशी येशील नक्कीच मुक्या मनाचं काहूर घेऊन...!!! तुझ्याच आसपास रेंगाळत राहिलंय माझं मन त्या क्षणापासून! तुझ्या सानिध्यात का इतका शांत, शांत वाटावं? आयुष्यातले सगळे प्रश्न, सगळी उत्तरं, सगळ्या विवंचना का दूर कुठेतरी लोटल्या जाव्यात? तू नसताना पूर्ण वेळ एका दृश्य जगात डोळसपणे वावरणारी मी, तुझ्या सानिध्यात का अचानक एका अज्ञाताच्या वेडाने पछाडली जावी? जे जे हवं असतं माझं जगणं समृद्ध करण्यासाठी ते ते तुझ्याजवळ असताना का लाभावं? नाही सापडत या प्रश्नांची उत्तरं!!! अजून बेचैन होऊन जाते मी.. वेड्यासारखी पडताळत राहते माझ्याच जाणीवा, ज्या तुझ्या येण्याने माझी साथ सोडून जातात.. पुन्हा एकदा तुझ्याजवळ येण्याची आस लावून जातात!!

तुझ्याजवळ इतकं मुक्त, इतकं शांत का वाटावं?? कारण तुझ्यासोबत मी "मी" असते. सतत बाळगलेला एकेक मुखवटा गळून पडतो तुझ्यासमोर. माझे अश्रू सावरणारी असतेस तू.. मला कुशीत घेणारी, माझ्यातले "मी"पण जपणारी!! कुठलेही पूर्वसंकेत, पूर्वग्रह, अभिनिवेश न ठेवता स्वीकारतेस तू "मला"!! माझे लाड करतेस.. माझ्याशी "मी" होऊन संवाद साधतेस.. माझ्या थकलेल्या मनाला शांत करतेस.. हळुवारपणे तुझ्या कोशात घेतेस माझ्या श्रांत मनाला.. सगळे व्याप, सगळे ताप हळूहळू विरत जातात.. दूर क्षितिजाकडे पाहताना केव्हा तुझ्या अस्तित्वाचा अंमल माझ्यावर चढतो ते कळत नाही!!!

आणि मग खोलवर दाटलेल्या उर्मी अनावर होतात. आतवर काहीतरी हेलावतं.. माझ्या मिटलेल्या डोळ्यांतून दोन थेंब झरतात तुझ्या कुशीत!! तेव्हाच प्रेमाने जागवत असतेस माझ्या निद्रिस्त मनातील काही भावना.. "हे कसं शक्य आहे??" म्हणून मी हलकेच मागे सारलेल्या शक्या-शक्यता माझ्यासमोर उलगडून दाखवतेस.. अगदी माझ्या हाताच्या अंतरावर!! 'हात पुढे केलास तर सगळं आहे आवाक्यात तुझ्या!' ठामपणे सांगतेस मला!! आणि तेव्हाच हलकेच तुझा पदर आणखी ओढतेस माझ्या डोळ्यांवर!! सगळं स्पष्ट दिसायला लागतं मला!! आणि मी विरघळत जाते त्या "माझ्या' जगात!!! पिसासारखी हलकी होऊन.. सगळ्या जाणिवांच्या पार, वेदनांच्या पार.. घेऊन जातेस मला!!

कधी आईची कूस होतेस, बाबांचा ठाम आधार होतेस, बहिणीचा आश्वासक स्पर्श होतेस, प्रियकराची बेभान मिठी होतेस, सखीचा प्रेमळ खांदा होतेस तर कधी हळूच माझ्यातले "मी"पण तोलून धरणा-या कृष्णसख्याची करंगळी होतेस!! अश्या असंख्य रुपात मला रोज भेटतेस.. माझी होऊन... माझ्यासाठी!! सगळ्या-सगळ्या भावनांना मोकळी वाट करून देतेस!! कधी अश्रू, कधी स्वप्नं.. क्षणभंगुर का होईना पण त्या क्षणांसाठी मला "माझी" करून जातेस!! एक विश्वास जागवतेस, एक उमेद जागवतेस!! तुझ्या कुशीत एका नवीन आशेने हसणा-या मला हलकेच माझ्याच हातात सोपवून निघून जातेस.. पण तुझ्या मैफिलीत रमलेल्या मला ते कधीच कळत नाही!!

कारण.... तुझ्या भैरवीत रमलेल्या माझ्यासाठी एका हळुवार भूपाळीची नांदी करून जातेस..........

स्वाती....