मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

रात हमारी तो.....!!

सांजावून आलंय बाहेर!! कातरवेळ उभी उंब-याशी!! तुझ्या येण्याची अनामिक चाहूल मनात... पण का हुरहुरतंय माझं मन, जरी ठाऊक आहे तुझं येणं निश्चित आहे!! जशी गेलीस भल्या पहाटे मला दूर लोटून, तशी येशील नक्कीच मुक्या मनाचं काहूर घेऊन...!!! तुझ्याच आसपास रेंगाळत राहिलंय माझं मन त्या क्षणापासून! तुझ्या सानिध्यात का इतका शांत, शांत वाटावं? आयुष्यातले सगळे प्रश्न, सगळी उत्तरं, सगळ्या विवंचना का दूर कुठेतरी लोटल्या जाव्यात? तू नसताना पूर्ण वेळ एका दृश्य जगात डोळसपणे वावरणारी मी, तुझ्या सानिध्यात का अचानक एका अज्ञाताच्या वेडाने पछाडली जावी? जे जे हवं असतं माझं जगणं समृद्ध करण्यासाठी ते ते तुझ्याजवळ असताना का लाभावं? नाही सापडत या प्रश्नांची उत्तरं!!! अजून बेचैन होऊन जाते मी.. वेड्यासारखी पडताळत राहते माझ्याच जाणीवा, ज्या तुझ्या येण्याने माझी साथ सोडून जातात.. पुन्हा एकदा तुझ्याजवळ येण्याची आस लावून जातात!!

तुझ्याजवळ इतकं मुक्त, इतकं शांत का वाटावं?? कारण तुझ्यासोबत मी "मी" असते. सतत बाळगलेला एकेक मुखवटा गळून पडतो तुझ्यासमोर. माझे अश्रू सावरणारी असतेस तू.. मला कुशीत घेणारी, माझ्यातले "मी"पण जपणारी!! कुठलेही पूर्वसंकेत, पूर्वग्रह, अभिनिवेश न ठेवता स्वीकारतेस तू "मला"!! माझे लाड करतेस.. माझ्याशी "मी" होऊन संवाद साधतेस.. माझ्या थकलेल्या मनाला शांत करतेस.. हळुवारपणे तुझ्या कोशात घेतेस माझ्या श्रांत मनाला.. सगळे व्याप, सगळे ताप हळूहळू विरत जातात.. दूर क्षितिजाकडे पाहताना केव्हा तुझ्या अस्तित्वाचा अंमल माझ्यावर चढतो ते कळत नाही!!!

आणि मग खोलवर दाटलेल्या उर्मी अनावर होतात. आतवर काहीतरी हेलावतं.. माझ्या मिटलेल्या डोळ्यांतून दोन थेंब झरतात तुझ्या कुशीत!! तेव्हाच प्रेमाने जागवत असतेस माझ्या निद्रिस्त मनातील काही भावना.. "हे कसं शक्य आहे??" म्हणून मी हलकेच मागे सारलेल्या शक्या-शक्यता माझ्यासमोर उलगडून दाखवतेस.. अगदी माझ्या हाताच्या अंतरावर!! 'हात पुढे केलास तर सगळं आहे आवाक्यात तुझ्या!' ठामपणे सांगतेस मला!! आणि तेव्हाच हलकेच तुझा पदर आणखी ओढतेस माझ्या डोळ्यांवर!! सगळं स्पष्ट दिसायला लागतं मला!! आणि मी विरघळत जाते त्या "माझ्या' जगात!!! पिसासारखी हलकी होऊन.. सगळ्या जाणिवांच्या पार, वेदनांच्या पार.. घेऊन जातेस मला!!

कधी आईची कूस होतेस, बाबांचा ठाम आधार होतेस, बहिणीचा आश्वासक स्पर्श होतेस, प्रियकराची बेभान मिठी होतेस, सखीचा प्रेमळ खांदा होतेस तर कधी हळूच माझ्यातले "मी"पण तोलून धरणा-या कृष्णसख्याची करंगळी होतेस!! अश्या असंख्य रुपात मला रोज भेटतेस.. माझी होऊन... माझ्यासाठी!! सगळ्या-सगळ्या भावनांना मोकळी वाट करून देतेस!! कधी अश्रू, कधी स्वप्नं.. क्षणभंगुर का होईना पण त्या क्षणांसाठी मला "माझी" करून जातेस!! एक विश्वास जागवतेस, एक उमेद जागवतेस!! तुझ्या कुशीत एका नवीन आशेने हसणा-या मला हलकेच माझ्याच हातात सोपवून निघून जातेस.. पण तुझ्या मैफिलीत रमलेल्या मला ते कधीच कळत नाही!!

कारण.... तुझ्या भैरवीत रमलेल्या माझ्यासाठी एका हळुवार भूपाळीची नांदी करून जातेस..........

स्वाती....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा