(हा लेख मी आणि माझा एक मित्र (जो दुर्दैवाने आता हयात नाही.. :( ) असं दोघांनी मिळून लिहीलेला आहे.)
माणसाची व्याख्या अनेकांनी (म्हणजे माणसांनीच) आपापल्या परीने केली आहे. कुणाच्या मते माणूस हा ’समाजशील’ प्राणी आहे. पण माणूस आणि समाजात ’स’ आणि ’म’ शिवाय काहीही साम्य नाही. बहुधा सर्व माणसे समाजात ’शील’ राखण्यासाठी जगतात म्हणून हे नाव पडले असावे.
काहींच्या मते माणूस शिस्तप्रिय प्राणी आहे. पण मुंग्यांशिवाय या जगात कुणीही सरल चालत नाही. तात्पर्य काय तर माणसाची व्याख्या (माणसांनीच केलेली) अपूर्ण आहे.
खरे म्हणजे माणूस हा स्नेहसंमेलने करणारा प्राणी आहे. माणसांशिवाय इतर कुणीही प्राण्यांनी स्नेह्संमेलने केल्याचे ऐकीवात नाही. सिंह आणि वाघ शेजारी बसले आहेत, मोर सुंदर नॄत्य करतो आहे, कोकिळा गाणे गात आहे, हत्ती-घोडे सर्कस करीत आहेत, कोल्हा सूत्रसंचालन करत आहे. असे संमेलन कधीच नसते. (शंकेखोर वाचकांनी इसापनीतितील प्राण्यांचा विचार करु नये.)
म्हणूनच माणूस हा स्नेह्संमेलने करणारा प्राणी आहे. "खरीप हंगामात रब्बी पिकांची लागवड" पासून ते "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" पर्यंत अनेक संमेलने होत असतात. काहींच्या मते संमेलनांना निमित्त लागते परंतु वास्तविक पहाता संमेलनांच्या निमित्ताने लोक आपले (अ)विचार, कला सादर करतात. इतर कुठल्याही ठिकाणी वाचल्या किंवा ऐकल्या न जाऊ शकणा-या कविता कवी लोक "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात" (येथे मराठी ऐवजी हिंदी, बंगाली, इंग्रजी, कन्नड इ. लिहीता येऊ शकतात.) ऐकवतात. काही हौशी पालकांनी आपल्या मुलांना हट्टाने तबला, पेटी, गायन इ. क्लासला घातले असल्यास, ती मुले संमेलनात आपली कला दाखवून आपल्या पालकांचा निर्णय कसा चुकीचा होता हे दाखवून देतात.
अशाच एका स्नेहसंमेलनाला जाण्याचा परवा योग (की भोग?) आला. संमेलनाला अध्यक्ष कोण, हा प्रश्न गौण असतो. श्री. कुक्कुटराव मुर्गीवाले (मालक: कुक्कुटेश्वर पोल्ट्री प्रा. लि.) पासून ते श्री. मा. ज. लेले पर्यंत कुणीही अध्यक्ष म्हणून चालतो. लोकांना वाटतं अध्यक्ष होणं म्हणजे काय? दोन शब्द बोलायचे आणि खुर्चीवर जाऊन बसायचं, पण वास्तविक ज्यांचं जळलं आहे त्यांनाच कळेल. अध्यक्षांना कारण नसताना संबंधित संस्थेवर स्तुतीसुमने उधळावी लागतात. परत भाषण सुरु झाल्यावर लोकांना इन्टर्वल झाला आहे असा गैरसमज होण्याचा धोका असतो. बक्षिस वाटपाला तर फ़ारच पंचाईत होते. एखाद्या मुलीला बक्षिस देताना (प्रथम क्रमांक: लिंबू चमचा शर्यत) उगीचच कौतुकाने हसावे (व नंतर फ़सावे) लागते. आता लिंबू चमचा शर्यत प्रथम क्रमांक यात कसले आले आहे कौतुक पण हसतात बिचारे... काही उत्साही पालक आपल्या मुलांचे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढतात. त्यामुळे अध्यक्षांना वेगवेगळ्या पोजेसला उभे राहावे लागते. सर्वात कठीण म्हणजे पुढील सर्व कार्यक्रम खुर्चीवर बसून न हालता (व न झोपता) पाहावे लागतात. तात्पर्य काय तर संमेलनाचा अध्यक्ष कोण हा प्रश्न गौण आहे.
कुठलेही संमेलन वेळेत सुरु न होणे हे ढगातून पाणी पडण्यासारखे स्वाभावीक आहे. (ढगातून पाणी पडण्याचा आणि वेळेचा इथे आईशप्पथ काहीही संबंध नाही.) तर ते किती उशीरा सुरु होते यावर त्याचे महत्त्व ठरते.
कुठल्याही संमेलनाला संयोजक हवा असतो. आम्ही उपस्थित असलेल्या सर्व कार्यक्रमालाही संयोजक होते. संयोजकाच्या अवतार लग्नातल्या नव-याच्या भावासारखा होता. संयोजकही निवडावा लागतो. अतिशय स्थितप्रज्ञ संयोजक समारंभाचा विचका करु शकतो. तो थोडा भांबावलेलाच असला पाहीजे. तो एका वेळी अनेकांना सुचना देण्याइतपत अष्टावधानी असतो. "अरे राजा फ़ुलं आण, नारळ कुठे आहे? टेबल सांडेल ना..- उभा धर, अरे इकडे खुर्च्या लौकर फ़ोड..- अरे तो माईकवाला आला का? पडदा लावला का? सतरंजी इकडे नको तिकडे...." यातून कार्यकर्त्याला आपल्यासाठी कोणती सुचना आहे हे कळावे लागते. त्यांचे प्रश्न असतातच....
पहिला: सर फ़ुलं नाही आली.
दुसरा: टेबल
तिसरा: क्लॉथ
चौथा: टेबल क्लॉथ
पहिला: सर, अध्यक्षांचा फ़ोन होता, त्यांना उशीर होईल.
खुर्चीवाला: सर, स्पीकर बिघडलाय.
माईकवाला: सर, खुर्च्या कमी पडतायेत.
एक प्रेक्षक: सर, प्रेक्षक घाई करताहेत.
पहिला: सर, लाईट कुठे लावू?
दुसरा: सर, सतरंज्या कुठे घालू?
तिसरा: सर, सरस्वतीचा फोटो कुठे लावू?
.
.
.
.
.
सतरावा: सर, नारळ कुठे फ़ोडू?
संयोजक: माझ्या डोक्यावर...
पहिला: नाहीये त्यांना... म्हणजे अध्यक्षांना वेळ नाहीये.
असे करता करता शेवटी संमेलन सुरु होते. सुत्रसंचालक माईकवर "हेलो हेलो" का म्हणतात कोण जाणे? कदाचीत कुणाचे नाव पुकारले आणि माईक बिघडला असल्यास विपर्यास होऊ शकतो. परंतु प्रेक्षकांचा गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी हे म्हणत असावा (हेलो हेलो हा शब्द ’हळू हळू’ ची व्युत्पत्ती.) गणेश वंदनाने, गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होते. केवळ हे देवाचे गाणे असते म्हणून लोक आधी आवंढा व नंतर राग गिळून गप्प राहतात. संमेलनाचे सुत्रसंचालक आठवतील तेवढ्या म्हणी, सुविचार यांचा मुक्त कंठाने वापर करतात. खरं तर "टवाळा आवडे विनोद" हे वाक्य एक विनोदी नाटकानंतर म्हणायची काहीच आवश्यकता नसते. माईकमधून किं........ असा आवाज येतो तो नेमका नाटकाच्या वेळीच का कोण जाणे??
कलाकारांचे ’जवळून’ दर्शन फ़क्त एकच जण घेऊ शकतो किंबहुना ते तो घेतोच, तो म्हणजे फोटोग्राफ़र. नेमका नाच रंगात आला असताना त्याच्या अंगात येते. प्रेक्षकांच्या भावनांशी त्याला काहीही घेणे देणे नसते. अख्ख्या कार्यक्रमात न हसणारे आणि न बोलणारे दोघेच.. एक माईकवाला आणि दुसरा फ़ोटोग्राफ़र! फ़ोटोग्राफ़र ’नटसम्राट’ असु दे किंवा पाश्चात्य पद्धतीचे नॄत्य असु दे, एकाच अलिप्त भावनेने पाहतो.
काही मंडळी उगाचच इकडून तिकडे फ़िरत असतात. लग्नात ज्याप्रमाणे करवल्या हिंडतात त्या आविर्भावात... बहुतेकांची अशी समजूत असते की ’तो’ किंवा ’ती’ आपल्याकडेच ’बघतो’ किंवा ’बघते’ आहे. त्यामुळे तेही हळूच बघून घेतात. वास्तविक त्यांचा यात काहीही सहभाग नसतो. तरीही उगाचच पुढे पुढे करतात. ह्यांना एका जागी बसल्यावर अपमानित झाल्यासारखे वाटत असावे किंवा त्यांना उभे राहून जास्त मजा येत असावी.
अशातच पडेल ते काम करणारे काही स्वयंसेवक असतात, (पु. लं. च्या नारायणप्रमाणे). इतर वेळेस यांच्यावाचून काहीही न करता येणा-यांचे ते सत्काराला किंवा फोटोसाठी आले नाहीत तर काहीही अडत नाही. बरोबरच आहे, ते जर स्टेजवर आले तर पडद्यामागची सुत्रे कोण हलवणार? कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहारात जेव्हा सगळेजणं मशगुल असतात तेव्हा ते रिकाम्या प्लेट्स आणि शीतपेयांचे रिकामे ग्लास उचलत असतात.
(तळटीप: चाणाक्ष वाचकांना प्रस्तुत लेखकाने (म्हणजे आम्हीच) पु. लं. च्या लेखनाची (असफ़ल??) नक्कल करण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय येईल. साहजिकच आहे, त्यांची चार-पाच पुस्तके आजूबाजूला ठेवूनच हा लेख लिहिला आहे. क. लो. अ.)
-स्वाती...
Apratim swati...
उत्तर द्याहटवाkeep it up... :)
छान झालाय लेख. तळटीप आवडली. पुलंच्या मदतीशिवाय आपण (म्हणजे आपण कोणीच या अर्थी) पाव पानही विनोदी लेखन करू शकत नाही. :-)
उत्तर द्याहटवासुरुवातीच्या कंसाने उगाचच थोडी हळहळ वाटली.. :(